दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या एका विमानात धक्कादायक घटना घडली. ‘फ्लायदुबई’च्या एका विमानात सह-वैमानिकाने कॉकपिटमध्ये दुसऱ्या वैमानिकावर भीषण हल्ला केल्याची घटना समोर आल्यानंतर अवघ्या जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भारतीय कॅप्टन स्मित मच्छार हे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, स्मित मच्छार यांनी विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचं अवघ्या जगभरातून कौतुक होत आहे.

या विमानात घडलेल्या या घटनेबाबत आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी एक व्हिडीओ शेअर करत कारवाईचा इशारा दिला आहे. या घटनेचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसं या घटनेचं चित्र अधिक स्पष्ट होत आहे. हा हल्ला घडवून आणण्यासाठी या हल्लेखोर सह-वैमानिकाला ज्याने कोणी पाठवलं असेल, त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल’, असा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पंतप्रधान नेतान्याहू काय म्हणाले?

“फ्लायदुबईच्या विमानात हल्ला करणाऱ्या संशयिताचा प्रवाशांसह विमान कोसळवण्याचा हेतू होता. मात्र, ज्याने त्याला पाठवलं, त्याला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जसा वेळ जात आहे, तसं चित्र अधिक स्पष्ट होत आहे. ही दुर्घटना शूर सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली. हल्लेखोराचा प्रवाशांसह विमान पाडण्याचा हेतू होता, पण त्याला कोणी पाठवलं होतं का? याचा आम्ही तपास करत आहोत, ज्याने त्याला पाठवलं त्याला याची मोठी किंमत मोजावीच लागेल”, असा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिला आहे.

‘फ्लायदुबई’च्या विमानात काय घडलं?

दुबईहून तेल अवीवच्या दिशेने या विमानाने उड्डाण केल्यानंतर ३४ हजार फूट उंचीवर असतानाच कॉकपिटमध्ये पायलट व को-पायलट यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही क्षणांत सह-वैमानिकाने वैमानिकावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मच्छार गंभीर जखमी झाले. सध्या या घटनेदरम्यानचे विमानातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादामुळे ३४ हजार फुटांवरून अवघ्या एका मिनिटात हे विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आलं, ज्यामुळे विमानावरील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. त्यानंतर अखेर हे विमान सौदी अरेबियामध्ये सुखरूप उतरवण्यात आलं.

इस्रायलकडून मच्छार यांचा सन्मान होणार

‘फ्लायदुबई’ विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचा इस्रायलकडून विशेष सन्मान केला जाईल, अशी घोषणा भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी केली आहे. हवेत असताना विमानावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि निर्धार यामुळेच सुमारे १८० प्रवाशांचे प्राण वाचू शकले, असं सांगत अझार यांनी स्मित यांचा ‘खरा नायक’ असा गौरव केला.