पीटीआय, नवी दिल्ली

मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती ‘नेटफ्लिक्स इंडिया’ने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाला दिली.

चित्रपटाचे शीर्षक आक्षेपार्ह आणि बदनामीकारक असून त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी न्या. पुरुषैंद्र कुमार कौरव यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी हे निवेदन करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, ‘उद्भवलेल्या चिंतेचा विचार करता निर्मात्यांनी ‘घूसखोर पंडत’ या नावाऐवजी चित्रपटाचे कथानक आणि हेतू अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करणारे पर्यायी शीर्षक देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.’

‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक नीरज पांडे यांनी केली आहे. नेटफ्लिक्सच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, “संपादनाच्या टप्प्यात असलेला हा चित्रपट काल्पनिक पोलीस-नाट्य असून, त्याच्या शीर्षकामुळे अनाहूत वाद निर्माण झाले, ते चित्रपटाच्या आशयाशी सुसंगत नव्हते.” चित्रपटाच्या सर्व प्रचारात्मक साहित्यालाही हटवण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.