देशाच्या पंतप्रधानपदी आपल्याला मायावतींपेक्षा नरेंद्र मोदींना बघणे आवडेल या वक्तव्यावरून अरविंद केजरीवाल यांनी घूमजाव करत आपण असे कधीच म्हटले नसल्याचे सांगितले. केजरीवालांच्या या वक्तव्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती मात्र, आपण अशाप्रकारचे कोणतेही विधान केले नसल्याचे केजरीवालांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले.
समजा तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवली आणि पंतप्रधानपदासाठी तुम्हाला मायावती आणि नरेंद्र मोदी दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगितल्यावर काय कराल? या प्रसारमाध्यमांकडून ट्विटरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण मोदींचे नाव घेतले असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांच्याकडून भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी आणि गुजरात राज्याच्या विकास मॉडेलवर सातत्याने टीका करण्यात येत होती. गेल्याच आठवड्यात केजरीवाल यांनी मोदींनी केलेल्या विकासकामांच्या ‘तपासणी’साठी गुजरात दौरासुद्धा केला होता.