गोरखपूरहून मुंबईला येणारं विमान खूप उशीर होऊन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं. स्पाईसजेट कंपनीचं SG 553 हे विमान १ नोव्हेंबर रोजी गोरखपूरहून मुंबईला येणार होतं. विमानाला उशीर होईल असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं. प्रवाशांनी सहकार्य केलं. त्यानंतर आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल असं सांगण्यात आलं. त्यानंतर बोर्डिंगची प्रक्रिया सुरू झाली.
विमानातली वातानुकूलन यंत्रणा नीट काम करत नसल्याने प्रवाशांना त्रास होऊ लागला. त्यांनी यासंदर्भात कर्मचाऱ्यांना कळवलं. तंत्रज्ञांनी संबंधित यंत्रणेतला बिघाड दुरुस्त करायला सुरुवात केली. यामध्ये दोन तास गेले. संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटं सुटणं अपेक्षित असलेलं विमान अखेर रद्द करण्यात आलं. हा सगळा प्रकार १ नोव्हेंबरचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान अभिनेत्री विजयलक्ष्मी माल्या हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हा प्रकार स्पष्ट झाला.
या सगळ्या प्रकाराने संतापलेल्या प्रवाशांनी रनवेवरच ठाण मांडला. रनवेवर झोपावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं अशा शब्दांत अभिनेत्री विजयलक्ष्मी माल्या हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘स्पाइसजेटच्या गोंधळामुळे विमानाच्या खाली रनवेवर झोपले आहे. मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मात्र विमान आयत्यावेळी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. आता मुंबईला कसं जायचं या विवंचनेत सगळे आहेत’, असं विजयलक्ष्मीने सांगितलं. बाकी प्रवासीही रनवेवर ठाण मांडून बसल्याचं चित्र व्हीडिओत दिसलं. विजयलक्ष्मीही ही या विमानाने प्रवास करत होती. विमानातूनच केलेल्या व्हीडिओत तिने राग व्यक्त केला.
‘बोर्डिंग पूर्ण होऊन आम्ही सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर विमान रद्द करण्यात आलं. अगम्य आहे हे. जराही व्यावसायिकपणा नाही. गोरखपूर विमानतळावर रात्री ८ नंतर उड्डाणाला परवानगी नाही. मी गोरखपूरची आहे, मी अनेकदा प्रवास केला आहे. जर तुम्हाला या निर्बंधांबद्दल माहिती होतं मग तुम्ही बोर्डिंग का केलं? प्रवाशांच्या वेळेची, पैशाची काहीच किंमत नाही का? प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन्स आहेत, अनेकांना पुढचा प्रवास करायचा आहे- हा मनस्ताप कशाला? तुम्ही प्रवाशांना नीट कल्पना द्यायला हवी होती. आम्ही तुमच्या हातातलं बाहुलं आहोत का? किमान आदर द्या’, असं आवाहन तिने केलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी विमानतळावर दोन तास आधी पोहोचूनही एका प्रवाशाचं स्पाइसजेटचं विमान चुकलं होतं.
