scorecardresearch

“…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

बायडेन प्रशासनाने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याऐवजी ठरलेल्या तारखेआधी बाहेर पडण्याला प्राधान्य दिलं. ठरलेल्या तारखेलाच बाहेर पडावं अशी काही अट नसल्याची टीकाही केली.

biden vs trump
अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

अमेरिकेच्या इतिसाहासामध्ये कधीच युद्धामधून माघार घेताना परिस्थिती एवढ्या चुकीच्या पद्धतीने हाताळली गेली नव्हती, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून घेतलेली माघार या विषयावर टीप्पणी केली आहे. अमेरिकन सैन्याने ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी अफगाणिस्तानमधील सर्व तळ सोडून मायदेशी परतल्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन सरकावर निशाणा साधलाय. इतकच नाही तर बाहेर पडताना अमेरिकने काही गोष्टी नष्ट करायला हव्या होत्या असं सांगत ट्रम्प यांनी थेट बॉम्ब टाकण्याची भाषा केलीय.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचं तालिबानला खुलं समर्थन, म्हणाला, “ते जबरदस्त…”

“बायडेन प्रशासनाने ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमधून माघार घेतलीय. त्यापद्धतीने अमेरिकेच्या इतिहासामध्ये कधीच इतक्या कमकुवतपणे युद्धातून माघार घेण्यात आली नव्हती,” असा टोला ट्रम्प यांनी लगावला आहे. अमेरिकेच्या इतिसाहातील सर्वात दिर्घ संघर्ष म्हणून समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानमधील संघर्ष अमेरिकन सैन्याचे शेवटचे सी १७ विमान काबूल विमानतळावरुन हवेत झेपावल्यानंतर संपुष्टात आला.  अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत. अमेरिकन लष्कराच्या सैनिकांची शेवटची तुकडी काल (३० ऑगस्ट २०२१ रोजी) दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अफगाणिस्तानमधून रवाना झालेल्या सी -१७ विमानामधून मायदेशी परतलेत.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

“अमेरिकेच्या मालकीची सर्व शस्त्र तातडीने अमेरिकेत आणणं गरजचं होतं. यामध्ये अमेरिकने खर्च केलेल्या ८५ बिलियन डॉलरमधील प्रत्येक पैसा ज्यासाठी खर्च झालाय ते परत आणायला हवं होतं. जर ते परत आणलं गेलं नसेल तर आपण पुन्हा तिथे जाऊन ते परत आणलं पाहिजे. ते शक्य नसेल तर किमान त्या गोष्टींवर बॉम्ब टाकून त्या नष्ट केल्या पाहिजेत. कोणीही असा बावळटणा करुन माघार घेतली जाईल असा विचार केला नव्हता,” असं ट्रम्प म्हणाले आहेत.

बायडेन यांनी नियुक्त केलेले विशेषाधिकारी झॅलमे खालीलझाद यांनी तालिबानसोबत अमेरिकेचा तह घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र यावरुन माजी सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पिओ यांनी बायडेन प्रशासनावर टीका केलीय. बायडेन प्रशासनाने परिस्थितीनुसार निर्णय घेण्याऐवजी ठरलेल्या तारखेआधी बाहेर पडण्याला प्राधान्य दिलं. ठरलेल्या तारखेलाच बाहेर पडायला हवं होतं अशी काही अट नव्हती. अमेरिकन लेकांना अमेरिका अधिक सुरक्षित वाटली पाहिजे अशी अट असल्याचा टोला माइक यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”

जनरल केंथ मॅकन्झी यांनी संपूर्ण सैन्य मागे घेतल्याची घोषणा केलीय. केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केलं. “अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची मी घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेलं मदतकार्य पूर्ण झालं आहे. अमेरिकेच्या शेवटच्या सी -१७ विमान हे हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी उड्डाण केलं आहे.” असं मॅकन्झी म्हणालेत.

तसेच लष्करी मदकार्य संपलं असलं तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणं आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं मेकन्झी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी “अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्याच्या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिलीय. “अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून असणारी आमच्या सैन्याची उपस्थिती संपुष्टात आलीय. यासाठी मी आमच्या लष्कराच्या कमांडर्सचे आभार मानू इच्छितो की त्यांनी इतक्या धोकादायक वातावरणामध्ये अफगाणिस्तानमधून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ३१ ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये संपूर्ण लष्कर मागे घेतलं आणि त्यात अमेरिकन नागरिकांना प्राण गमावावे लागले नाहीत,” असं म्हटलं आहे.

अमेरिकचे संरक्षण विभागाने ही अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या कमांडरचा फोटो ट्विट केलाय. मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे ३० ऑगस्ट रोजी सी-१७ विमानामध्ये चढणारे आणि अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन लष्करी अधिकारी ठरले. यासोबतच अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील मोहीम संपुष्टात आलीय असं या फोटोसहीत दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

बायडेन यांनी मागील १७ दिवसांमध्ये अमेरिकन लष्कराने अमेरिकन ऐतिहासामधील सर्वाधिक संख्येने म्हणजेच १ लाख २० हजार अमेरिकन नागरिक, अफगाणिस्तानमधील सहकारी आणि इतरांना एअरलिफ्ट केलं असल्याची माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-08-2021 at 12:52 IST

संबंधित बातम्या