पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना पाठिंबा
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात लेखकांनी पुरस्कार परत करून निषेध व्यक्त केला असतानाच प्रख्यात गीतकार गुलजार यांनीही आता निषेधाचा सूर आळवला आहे. ‘लेखकाची, साहित्यिकाची हत्या होणे हे शासनव्यवस्थेचे अपयश आहे, आणि लेखक पुरस्कार परत करूनच अशा हिंसक घटनांचा निषेध व्यक्त करू शकतो. यापूर्वी कधीही आम्ही अशा प्रकारची टोकाची असहिष्णुता अनुभवली नव्हती’, अशा शब्दांत गुलजार यांनी देशातील सद्य:स्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पुरस्कार परत करण्याच्या लेखकांच्या कृतीला पाठिंबाही दर्शविला आहे.
प्रख्यात कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या, दादरीतील घटना, त्यानंतर देशभरात निर्माण झालेले गढूळ वातावरण या सर्वाचा निषेध म्हणून लेखक व साहित्यिकांनी शासनाचे पुरस्कार परत करण्याचे सत्र अवलंबले आहे. साहित्य अकादमीने शुक्रवारी बैठक घेऊन पुरस्कारवापसीचे सत्र थांबवण्याचे आवाहन लेखकांना केले आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर गुलजार यांनी शनिवारी त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली.
गुलजार पुढे म्हणाले की, ‘देशात अशी परिस्थिती निर्माण होईल असे कधी वाटलेही नव्हते. आज व्यक्तीला त्याचे नाव विचारण्याआधी धर्म विचारला जात आहे. असे वातावरण पूर्वी कधी अनुभवले नाही. लेखकाची हत्या होणे ही जिवाला चटका लावणारी घटना आहे. अशा परिस्थितीत लेखक पुरस्कार परत करण्याव्यतिरिक्त अन्य काही करू शकत नाही. यात राजकारण आहे असे कोणी म्हणू शकत नाही’.

लेखक अंतकरणापासून लिहित असतो. लेखक हे समाजाच्या विवेकबुद्धीचे रक्षक आहेत. समाजभान राखणारे ते सर्जनशील व्यक्तिमत्त्व असते. अशावेळी लेखकाची हत्या होणे ही घटना जिवाला चटका लावणारीच असते.
– गुलजार, गीतकार