Controversy Over BJP President’s Statement on Rabindranath Tagore: नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतलेले नितीन नबीन एका वक्तव्यामुळे टीकेचे धनी झाले आहेत. “रवींद्रनाथ टागोर यांना शांततेचं नोबेल मिळालं होतं”, असं विधान नबीन यांनी एका रॅलीला संबोधित करताना केलं. या विधानावरुन विरोधकांनी नबीन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसने तर भाजपा अध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे.

काय म्हणाले नितीन नबीन?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बुधवारी दुर्गापूर येथील एका रॅलीला संबोधित करत होते. यावेळी नबीन यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले. “कवीगुरु यांनी संपूर्ण देशाला शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. मी रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण करतो”, असे नतीन नबीन म्हणाले.

ममतांच्या तृणमूलकडून माफीची मागणी

नबीन यांच्या वक्तव्यावरुन ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने टीका करतानाच माफीची मागणी केली आहे. नितीन नबीन यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागून त्यात दुरुस्ती करावी अशी मागणी तृणमूलकडून करण्यात आली आहे. “रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यात दिलेल्या योगदानासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला, याची माहिती त्यांना (नबीन) नसावी. ‘गीतांजली’ त्यांनी कधी ऐकले नाही बहुतेक”, असा टोला तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी लगावला.

“भाजपाला बंगाली भाषा आणि संस्कृतीचा आदर नाही हे आम्ही नेहमी सांगत आलोय. देशासाठी बंगालच्या असलेल्या योगदानाची भाजपाला कल्पना नाही”, असेही घोष म्हणाले.

काँग्रेसकडून टीका

“बंगालच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ नाही. ‘बंकिमदा’ असं मोदींनी केलेलं विधान, बंगालच्या संस्कृतीबाबत केंद्रीय गृहमंत्री भाषणात देत असलेले चुकीचे संदर्भ किंवा भाजपाचे नेते विप्लव देव, अमित मालवीय अथवा दिलीप घोष यांना बंगालच्या संस्कृतीबाबत पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आले आहे”, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शंकर म्हणाले.

पंतप्रधान, गृहमंत्री ते नेत्यांची वक्तव्य वादात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना ‘दादा’ (मोठा भाऊ) असे संबोधल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख रवींद्रनाथ सन्याल असा केला होता. मध्य प्रदेशातील एका भाजप नेत्याने तर भारतीय सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सुधारणांचे प्रणेते असलेल्या राजा राममोहन रॉय यांना ब्रिटिश एजंट म्हणून संबोधित केले होते. आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.