पृथ्वीपासून १५ दशलक्ष प्रकाशवर्षे इतक्या दूर अंतरावर जवळच्या दीर्घिकेत खगोलवैज्ञानिकांना एक छोटे पण शक्तिशाली कृष्णविवर सापडले आहे. वैज्ञानिकांनी त्याला एमक्यू १ असे नाव दिले असून ते जवळच्या एम ८३ या दीर्घिकेत आहे. ते नियमित आकाराचे छोटे कृष्णविवर आहे. आतापर्यंत सैद्धांतिक रूपात जितके मोठे कृष्णविवर अपेक्षित होते त्यापेक्षा जरासे मोठे असलेले हे कृष्णविवर आहे. क्युरटिन विद्यापीठातील संशोधक डॉ. रॉबर्ट सोरिया हे आंतरराष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र संशोधन संस्थेचे सदस्य असून त्यांनी व त्यांच्या पथकाने एमक्यू १ या कृष्णविवराचा अभ्यास केला आहे. एमक्यू १ प्रकारचे कृष्णविवर हा सूक्ष्म
क्वासारचा भाग असून यात कृष्णविवराभोवती तप्त वायूचे बुडबुडे असतात. अतिशय जोरात विरोधी दिशेने सुटणाऱ्या तप्त प्रवाहांमुळे ते तापत असतात व वैश्विक स्वरूपात सँडब्लास्टर म्हणून काम करीत असतात. एमक्यू १ या कृष्णविवराची क्षमता ही त्याच्या दीर्घिकेबाहेर जाणारी आहे. कृष्णविवरांच्या उष्णप्रवाहांचे आजूबाजूच्या उष्णवायूंवर होणारे परिणाम तपासण्यात त्यामुळे वैज्ञानिकांना मदत होणार आहे.  
दीर्घिकेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत १२ अब्ज वर्षांपूर्वी काही महत्त्वाचे घटक होते त्यामुळे आपल्याला एमक्यू १ सारखी शक्तिशाली कृष्णविवरे अभावाने का होईना सापडतात असे सोरिया यांनी म्हटले आहे. एमक्यू १ या कृष्णविवराच्या रूपातून सूक्ष्मक्वासारच्या अभ्यासातून पूर्वीचे विश्व कसे होते. वेगवान क्वासार कसे निर्माण होतात व कृष्णविवरे त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात ते किती ऊर्जा सोडतात यावरही या संशोधनातून नवा प्रकाश पडणार आहे. आपल्या दीर्घिकेत एसएस ४३३ हा सूक्ष्म क्वासार असून त्याची ऊर्जा जास्त मानली जात होती, पण ती एमक्यू १ पेक्षा दहा पटींनी कमी आहे. एमक्यू  १ मधील कृष्णविवर १०० किलोमीटर व्यासाचे असले तरी त्याचा आकार आपल्या सौरमालेपेक्षा मोठा वाटतो.
 हबल अंतराळ दुर्बीणीने त्याच्या केलेल्या निरीक्षणानुसार हे कृष्णविवर दोन्ही बाजूने २० प्रकाशवर्षे लांब आहे. कृष्णविवरांचा आकार व वर्ग हा त्यातील तारकीय वस्तुमानावर अवलंबून असतो सूर्यापेक्षा त्याचे वस्तुमान ७० टक्के कमी असते. काही कृष्णविवरांचे वस्तुमान लाखो सूर्याच्या वस्तुमानापेक्षा जास्त असते. आपल्या आकाशगंगेत असे जास्त वस्तुमानाचे कृष्णविवर मध्यभागी आहे. एमक्यू १ ची निर्मिती ताऱ्याच्या मृत्यूनंतर झाली असावी व त्यानंतर काही वस्तुमान शिल्लक उरले असावे. एम ८३ या दक्षिण आकाशातील दीर्घिकेता नकाशा हबल व मॅगेलान, चंद्रा क्ष किरण दुर्बीण यांनी तयार केला आहे.