scorecardresearch

दरवाढीचे नवे ओझे; स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे  सहा आठवडय़ांत झालेली ही दुसरी वाढ आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे  सहा आठवडय़ांत झालेली ही दुसरी वाढ आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नघटकांपासून ते सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडणार आहे.

विनाअनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम सिलिंडरसाठी आता सध्याच्या ९४९.५० रुपयांऐवजी ९९९.५० रुपये मोजावे लागतील, असे सरकारी इंधन कंपन्यांनी म्हटले आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती मात्र एक महिन्याहून अधिक काळासाठी स्थिर आहेत. २२ मार्चपासून १६ दिवसांच्या कालावधीत पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे १० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

विना-अनुदानित घरगुती गॅस म्हणजे, अनुदानित किंवा बाजारभावापेक्षा कमी दराने मिळालेला वर्षांला १२ सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर ग्राहक ज्या भावाने सिलिंडर घेतो, तो होय. मात्र, बहुतांश शहरांमध्ये सरकार गॅस सिलिंडरसाठी काहीही अनुदान देत नाही आणि उज्ज्वला योजनेत मोफत गॅसजोडणी मिळालेल्या गरीब महिलांसह ग्राहकांना ज्या किमतीत नवे सिलिंडर मिळते, ती विना-अनुदानित किंवा बाजारभावात मिळणाऱ्या सिलिंडरइतकीच असते.

केवळ सहा आठवडय़ांत..

सहा आठवडय़ांत एलपीजीच्या किमतीत झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला ही किंमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. एप्रिल २०२१ पासून या किमती सिलिंडरमागे १९० रुपयांनी वाढल्या आहेत.

काँग्रेसची टीका..

तीव्र महागाई, गरिबी, बेरोजगारी आणि कु-प्रशासन यांमध्ये देशातील लाखो नागरिक भरडले जात आहेत. त्यामुळे सरकारने सिलिंडर दरवाढ मागे घ्यावी, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

दरबदल असे..

अनुदानित एलपीजी सिलिंडर मुंबईत ९९९.५० रुपयांना, चेन्नईत १०१५.५० रुपयांना, तर कोलकात्यात १०२६ रुपयांना मिळणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New burden inflation cooking gas expensive petrol diesel price hike food ingredients price ysh