Red Fort blast CCTV Footage: सोमवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात एका कारमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्फोटापूर्वीचा क्षण कैद झाला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने सदर सीसीटीव्ही चित्रणाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. ज्यामध्ये लाल किल्ल्यासमोरील मेट्रो स्थानकाजवळचा भाग दिसत आहे. सायंकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी असल्यामुळे वाहने सिग्नवरून हळूहळू पुढे सरकताना दिसत आहेत. स्फोटके असलेली आय२० गाडीही यात स्पष्टपणे दिसत आहे. अचानक घटनास्थळी आगीचा एक मोठा गोळा दिसून येतो.

चार सीसीटीव्हीच्या स्क्रीनवर सदर स्फोटाचे भीषण चित्र दिसत आहे.

दिल्ली कार स्फोटाचे प्रकरण पुढील तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एएनआय) सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच पांढरपेशी दहशतवादाचे जे मोड्युल उध्वस्त करण्यात आले, त्यात डॉ. मुझम्मील गनीला अटक झाली होती. या गनीने यावर्षी जानेवारी महिन्यात अनेकदा लाल किल्ला परिसराला भेट दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

गनीच्या मोबाइलची खोलवर तपासणी केल्यानंतर पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, आरोपींना २६ जानेवारी रोजी अतिरेकी हल्ला घडवून आणायचा होता. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त असल्यामुळे त्यांना हल्ला करणे शक्य झाले नाही.

दिल्ली लाल किल्ला स्फोट

उमर उन नबी हा स्फोटाच्या दिवशी आय२० गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. तो फरीदाबाद मधल्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. तसेच व्हाईट कॉलर मोड्युलमध्ये तो मुझम्मिल शकीलबरोबर काम करत होता. हे दोघेही स्फोटाच्या तपासाच्या केंद्रस्थानी असलेले दोन डॉक्टर आहेत. मुझम्मिल शकीलला अलीकडेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमध्ये कथित “व्हाईट कॉलर” दहशतवादी नेटवर्कवर कारवाई करताना छापे टाकताना अटक करण्यात आली होती.

सात जणांना अटक

लाल किल्ला स्फोट प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. मुझम्मील अहमद गनी, डॉ. अदील रादर, मोलवी इरफान अहमद, आरिफ निसार दार, यासिर-उल-अश्रफ, मकसूद अहमद दार आणि जमीर अहमद अहंगर यांना अटक झाली आहे.

सोमवारी स्फोट झाल्यानंतर बाजूलाच गर्दीने गजबजलेली चांदणी चौक बाजारपेठ तात्काळ बंद करण्यात आली. लाल किल्लाही तीन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.