येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना सुरुवातीला ‘ओम’ आणि काही संस्कृत श्लोकांचे उच्चारण करण्याच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार या माध्यमातून हिंदूत्त्ववादी अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर दुसरीकडे आयुष मंत्रालयाने निर्देश दिलेले असले तरी त्याची सक्ती नाही, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
गेल्यावर्षी ज्या पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला होता. त्यामध्ये यावेळी फार मोठा बदल करण्यात आलेला नाही. फक्त काही आसने नव्याने करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर योग दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही वेळ ओम स्मरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पण ते सहभागी नागरिकांवर बंधनकारक नाहीत. ज्यांना ओम स्मरण करायचे नाही, ते यावेळी शांत राहू शकतात, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव जसपाल एस. संधू यांनी गेल्या आठवडय़ात विद्यापीठांना पाठविलेल्या पत्रात योगादरम्यान आयुष मंत्रालयाचे शिष्टाचार पाळण्याचे निर्देश दिले होते. यावरून काँग्रेस, संयुक्त जनता दल, माकप आणि राजदने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.
योग ही प्राचीन भारताची मोठी देण आहे. त्यावर भाजपची मालकी नाही. योग अधिकाधिक व्यापक आणि स्वीकारार्ह करण्याची गरज आहे. मात्र, भाजप तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते पी. सी. चाको यांनी केली. संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनीही भाजपला लक्ष्य केले. भारतीयांवर जातीय अजेंडा लादण्याचा हा प्रयत्न असून, आमचा त्यास विरोध आहे, असे त्यागी यांनी स्पष्ट केले.