शेतकरी आंदोलनाच्या रेट्यानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने आता सोशल मीडियावर नवी पोस्ट केलीय. यात तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हटल्याचा आरोप करण्यात आलाय. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलंय. यावरून नवा वाद निर्माण झालाय. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हटलं?

कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही.”

“इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे,” असंही कंगनाने सांगितलं.

कंगनाने तिच्या दुसऱ्या एका इंस्टा स्टोरीत इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “देशात खलिस्तानी चळवळ फोफावत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक कालसुसंगत होत आहे. … लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणेल.”

कंगना रणौत वक्तव्याविरोधात तक्रार दाखल

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New controversial instagram post by kangana ranaut on khalistani terrorist pbs
First published on: 21-11-2021 at 10:51 IST