दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू प्रकार आढळला असून तो ‘डेल्टा’पेक्षाही घातकअसल्याने जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही देशांनी प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेसह त्या खंडातील सहा देशांतील प्रवासावर निर्बंध जारी केले आहेत. भीतीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून जगभरातील भांडवली बाजार आणि तेलबाजार गडगडले आहेत.

करोनाच्या या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव तरुण वर्गामध्ये वेगाने होत असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हाँगकाँग आणि बोत्स्वाना येथून दक्षिण आफ्रिकेत आलेल्या काही प्रवाशांची चाचणी केली असता ‘बी.१.१.५२९’ हा नवा उत्परिवर्तित विषाणू आढळला. त्याचा फैलाव वेगाने होत असून संशोधकांनी त्याच्या प्रादुर्भावाचा अभ्यास सुरू केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ग्वॉटेंग या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रांतात तरुणाईमध्ये या विषाणूचा फैलाव होत आहे. या विषाणूमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

 ‘गेल्या चार ते पाच दिवसांपासून नव्या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत एकूण किती रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे, याची माहिती संकलित करण्यात येत आहे,’ असे दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री जो फाला यांनी सांगितले.

विमानसेवा थांबवण्याचा युरोपीय देशांचा निर्णय

 ब्रसेल्स : नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याने युरोपीय देशांनी दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही राष्ट्रांतील विमानांना मज्जाव केला आहे.

सध्याच्या संकटात आणखी भर पडू नये यासाठी आफ्रिकेतील काही राष्ट्रांची विमानसेवा थांबवण्यात आली आहे,’ असे जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी सांगितले.

इटलीनेही आफ्रिकेतील सात राष्ट्रांची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून हॉलंडही लवकरच याबाबत निर्णय घेणार आहे.

इस्रायलमध्ये आणीबाणीजन्य परिस्थिती

मलावी देशातून इस्रायलमध्ये आलेल्या एका प्रवाशाला नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळल्याने पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी आणीबाणीजन्य परिस्थितीचा इशारा दिला आहे. इस्रायलने दक्षिण आफ्रिकेसह सहा आफ्रिकी देशांना ‘रेड कंट्रीज’ घोषित केले आहे.

‘डेल्टा’पेक्षाही घातक ?

* संसर्गाचा वेग ‘डेल्टा’पेक्षा अधिक, अनेक पटीने घातक

* लस घेतलेल्यांनाही संसर्गाचा धोका, तरुणांमध्येही फैलाव

* अंतर्गत संरचना वेगाने आणि मोठ्या संख्येने बदलण्याची क्षमता (म्युटेशन)

‘डब्ल्यूएचओ’ची तातडीची बैठक

जिनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी  बैठक घेतली. या विषाणूमध्ये मोठ्या संख्येने म्युटेशन (अंतर्गत संरचना बदलण्याची क्षमता) आहे.हा विषाणू नेमका कसा परिणाम करतो, हे सांगणे कठीण आहे. तसेच लस घेतलेल्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याने त्याचा धोका अधिक असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.