भारतीयांनो सावधान! ‘तो’ पुन्हा आलाय; दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट

केंद्र सरकारही आता सावध झालं असून आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ह्या नव्या विषाणूचा प्रसार वेगाने होत असून तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे. {प्रतिकात्मक छायाचित्र}

भारतात करोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने देशवासियांना आत्ता कुठे दिलासा मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

करोनाचा एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “दुर्दैवाने आम्हाला करोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या करोना संक्रमणाचे कारण आहे.”

ओलिवेरा अधिक पुढे म्हणाले की, हा व्हेरिएंट B.1.1.529 या नावाने ओळखला जातो. या विषाणूचे बोटस्वानामध्ये ३, दक्षिण आफ्रिकेत ६ तर हाँगकाँगमध्ये १ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारही सावध झालं असून आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा त्या मार्गे इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.

याविषयी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, देशातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त बैठकीत बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सरकारला ह्या विषाणूबद्दलची माहिती दिली आहे. हा विषाणूने वेगाने प्रसार होणारा असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी या भागातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन तपासणी करावी तसंच त्यांची नोंद ठेवावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New covid variant found in south africa mutating faster vsk

ताज्या बातम्या