Pralhad Joshi Education qualification And net worth: धर्मेंद्र प्रधान यांनी रजीनामा दिल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशींकडे सोपविण्यात आला आहे. नीट परीक्षा पेपरफुटीवरुन झालेल्या आंदोलनानंतर संबलपूरचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला. प्रधान पायउतार झाल्यानंतर त्याचदिवशी शनिवारी रात्री जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार मंत्री पदाची जबाबदारी आहे.

प्रल्हाद जोशी यांचे शिक्षण किती?

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांचे शिक्षण किती झाले आहे? याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. जोशींच्या शिक्षणाबाबत संसदेतील माहितीनुसार, जोशी यांनी कर्नाटकमधील हुबळी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८३ मध्ये कर्नाटक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या धारवाड येथील काडसिद्धेश्वर आर्ट्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी संपादन केली आहे.

प्रल्हाद जोशी यांची संपत्ती किती?

प्रल्हाद जोशी निवडणूक प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण २१.०९ कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्यावर ८.०१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचे मूल्य ८.९७ कोटी रुपये आहे. यामध्ये जोशींकडे २.७२ कोटी रुपये, त्यांच्या पत्नीकडे ५.९३ कोटी रुपये आणि मुलीकडे ३२.०३ लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. तसेच त्यांची स्थावर मालमत्ता १२.११ कोटी रुपयांची आहे.

प्रल्हाद जोशी यांची राजकीय कारकीर्द

२७ नोव्हेंबर १९६२ रोजी जन्मलेले प्रल्हाद जोशी २००४ मध्ये धारवाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून पहिल्यांदा संसदेत दाखल झाले. त्यानंतर २००९, २०१४, २०१९ आणि अलिकडच्या २०२४ च्या निवडणुकीतही त्यांनी धारवाड मतदारसंघावर वर्चस्व कायम राखत विजय मिळवला. पाच वेळा खासदार राहिलेले जोशी भाजपाच्या सर्वात दीर्घकाळ काम करणाऱ्या संसद सदस्यांपैकी एक आहेत.