नवी दिल्ली : करोना लसीकरण मोहिमेतील भारताच्या यशातून देशाची क्षमता दिसून आली असून; १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केल्यानंतर देश नव्या ऊर्जेसह वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीतांची स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सांस्कृतिक मंत्रालयाने केली असल्याचेही पंतप्रधानांनी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले. यासाठी नव्या भारताचा विचार प्रतिबिंबित करणाऱ्या, देशाच्या सध्याच्या यशाने प्रेरित झालेल्या आणि भविष्यासाठीचा संकल्प व्यक्त करणाऱ्या रचनांची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

अंगाई गीते पुनरुज्जीवित करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. नागरिकांकडून सूचना मिळाल्यानंतर, या गीतांशी संबंधित स्पर्धा आयोजित करण्याचे मंत्रालयाने ठरवले आहे. देशभक्तीपर अंगाई गीते, कविता व गाणी यांसारखे असे काही लिहावे, जे प्रत्येक घरातील माता  मुलांसाठी गाऊ शकतील, असे ते म्हणाले.

अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयातर्फे रांगोळी स्पर्धाही होऊ घातली असून, तीत लोक स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित प्रसंग चित्रित करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

नवे ड्रोन धोरण

देशाचे नवे ड्रोन धोरण हे  भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. यामुळे पूर्वीसारखे अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत किंवा  जास्त शुल्क भरावे लागणार नाही. नव्या ड्रोन धोरणामुळे अनेक देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी ड्रोन नवोपक्रमात गुंतवणूक केली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.