New Jersey Indian grocery store parval sale updates : न्यू जर्सीमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका भारतीय किराणा दुकानात भारतीय ग्राहकांची झुंबड उडाली. दुकानाच्या उद्घाटनावेळी दुकानदाराने स्वस्तात पडवळ देण्याचा सेल लावला. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी तेथे प्रचंड गर्दी केली. आता त्याचा व्हिडिओ समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अनेकांनी या गर्दीची तुलना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘ब्लॅक फ्रायडे’ सेलशी केली. फरक एवढाच होता की, यावेळी ही बंपर ऑफर भारतीय भाज्या आणि घरगुती किराणा सामानावर होती. ही ऑफर स्थानिक भारतीय समुदायामध्ये वाऱ्यासारखी पसरली. ऑफर चुकवू नये म्हणून अनेक ग्राहक दुकान उघडण्यापूर्वीच तिथे पोहोचले होते. शेकडो ग्राहकांनी नवीन सुपरमार्केटला भेट दिल्यामुळे उद्घाटनाच्या दिवशी तुफान गर्दी झाली.

नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स

दुकानातील गर्दी, चेकआउट काउंटरवरील गर्दी आणि ग्राहकांनी किराणा सामानाने भरलेल्या ट्रॉली घेऊन जाणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या गोंधळाच्या पण मजेशीर दृश्यांवर सोशल मीडिया युजर्सनी मिम्स आणि जोक्सचा वर्षाव केला. येथील वातावरण अगदी भारतातील गजबजलेल्या भाजी बाजारासारखे वाटत असल्यामुळे, नेटिझन्सनी याला “अमेरिकन भाजी मंडी” असं नाव दिलं आहे. भारतीय लोक जगात कुठेही राहिले, तरी ते फायद्याची डील शोधून काढतातच, अशी मिश्कील टिप्पणी अनेकांनी केली. तर एकाने ये नया इंडिया है, अशी कमेंट केली आहे.

या गमतीशीर घटनेपलीकडे, ही गर्दी अमेरिकेत भारतीय सुपरमार्केटची वाढती मागणी दर्शवते. अमेरिकेतील भारतीय समुदायाची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अस्सल भारतीय भाज्या, मसाले आणि प्रादेशिक खाद्यपदार्थ देणारी ही दुकाने आता केवळ खरेदीचे ठिकाण न राहता, घरची आठवण करून देणारी मुख्य केंद्र बनत आहेत.