एका ग्राहकाने सॅमसंग ग्लॅलेक्सी एस २३ अल्ट्रा ५ जी फोन खरेदी केला. त्यानंतर काही दिवसांतच फोन जास्त तापण्याची तक्रार आणि सदोष कॅमेरा या दोन त्रुटी समोर आल्या. सदर ग्राहकाने हा फोन १ लाख रुपयांना खरेदी केला होता. त्यामुळे त्याने केरळमधील जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. ज्यानंतर केरळमधल्या जिल्हा ग्राहक आयोगाने फ्लिपकार्ट, सॅमसंग कंपनी आणि सॅमसंगचं अधिकृत सर्व्हिस सेंटर तसंच मोबाइल विक्रेता यांना एका प्रकरणात जबाबदार धरलं आहे. आयोगाने संबंधितांना मोबाइलमधील दोष मोफत दूर करा असं सांगितलं तसंच १ लाख रुपयांची पूर्ण रक्कम आणि वरती २७ हजार रुपयांची भरपाई अशी एकूण १ लाख २७ हजारांची भरपाई ग्राहकाला द्या असे आदेश दिले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
श्रीकांत थेक्कन यांनी जानेवारी २०२४ या महिन्यात सॅमसंग गॅलेक्सी अल्ट्रा ५ जी फोन एक लाख रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर काही दिवसांतच या फोनमध्ये ओव्हरहिटिंगची समस्या होती. तसंच कॅमेराही सदोष होता कारण फोटो नीट येत नव्हते. यासंबंधीची तक्रार त्यांनी सॅमसंगच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये केली. मोबाइलची खरेदी वॉरंटी कालावधीत होती. पण तक्रार निवारण झालं नाही. ज्यानंतर श्रीकांत यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दाद मागितली. या प्रकरणात कन्नूर जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष रवी सुषा, सदस्य मोलीकुट्टी मॅथ्यू आणि सजीश केपी यांनी तक्रार ऐकली. ज्यानंतर आयोगाने ३० जूनच्या त्यांच्या आदेशात हे म्हटलं आहे की फ्लिपकार्ट, सॅमसंग आणि सॅमसंग सर्व्हिस सेंटर यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. पण कागदोपत्री पुराव्यांमुळे हे सिद्ध झालं आहे की उत्पादनात वॉरंटीच्या कालावधीत दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट, सॅमसंग कंपनी आणि सॅमसंग सर्व्हिस सेंटर हे तिन्ही यासाठी जबाबदार आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
श्रीकांत यांनी काय सांगितलं?
तक्रारदार श्रीकांत यांनी सांगितलं की, २७ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी फ्लिपकार्टवरून १ लाख रुपयांचा Samsung Galaxy S23 Ultra 5G फोन खरेदी केला. हा फोन २९ जानेवारीला वितरित झाला. मात्र, वापर सुरू करताच फोन जास्त गरम होणे आणि सॅमसंगने जाहिरात केलेल्या दर्जाचा कॅमेरा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सॅमसंग सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधला. मात्र, त्यांना बदलून नवीन फोन देण्यास किंवा सेवा देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांना फ्लिपकार्टशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. फ्लिपकार्टकडेही तक्रार नोंदवूनही कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली.
फ्लिपकार्ट आणि सॅमसंग यांनी काय सांगितलं?
फ्लिपकार्टच्या वतीने अॅड. ए. के. सजीतकुमार यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, ही तक्रार उत्पादनातील दोषाशी संबंधित असून फ्लिपकार्ट केवळ ऑनलाइन मध्यस्थ आहे. त्यामुळे ग्राहक आणि फ्लिपकार्ट यांच्यात थेट विक्रीचा करार नाही. सॅमसंगच्या वतीने अॅड. सी. व्ही. नारायणन यांनी मान्य केले की, ग्राहकाने ओव्हरहिटिंगच्या कारणावरून फोन बदलून देण्याची मागणी केली होती. मात्र, तपासणीनंतर फोनमध्ये ओव्हरहिटिंग होत नव्हतं. सॅमसंगने पुढे असा युक्तिवादही केला की, तक्रारदाराने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून सेकंड-हँड फोन खरेदी केला होता आणि विक्रेत्याने दिलेले वॉरंटी कार्डही सादर केले नव्हते. त्यामुळे जबाबदारी फ्लिपकार्ट आणि विक्रेत्याची असल्याचे कंपनीने सांगितलं होतं.
आयोगाने काय निर्णय दिला?
आयोगाने सगळ्या बाजू ऐकून ग्राहक श्रीकांत यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. आयोगाने हे नमूद केलं की, ही तक्रार एप्रिल २०२४ मध्ये, म्हणजे खरेदीनंतर अवघ्या तीन महिन्यांत दाखल करण्यात आली होती आणि संबंधित दोष वॉरंटी कालावधीतच निर्माण झाले होते. तसेच, ग्राहकाने वारंवार संपर्क साधूनही त्यांचे निराकरण झाले नाही. त्यामुळे आयोगाने फ्लिपकार्ट, सॅमसंगचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि विक्रेता यांना मोबाईलमधील दोष एका महिन्याच्या आत मोफत दुरुस्त करण्याचे, तसंच १ लाख रुपयांची खरेदीची रक्कम परत करण्याचे आदेश दिले. याशिवाय ग्राहकाला २० हजार रुपये मानसिक त्रासाची भरपाई आणि ७ हजार रुपये न्यायालयीन खर्च असे एकूण १ लाख २७ हजार रुपये ३० दिवसांच्या आत देण्याचेही निर्देश दिले.
