एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : भाजपचे नेते तेजिंदरपालसिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यात दिल्ली आणि हरियाणाचे पोलीस शुक्रवारी यशस्वी ठरल्यानंतर शनिवारी मोहाली येथील न्यायालयाने बग्गा यांच्याविरोधात नव्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरिवद केजरीवाल यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बग्गा यांच्याविरोधात पंजाब पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून भाजप आणि आप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर बग्गा हे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या घरी परतले होते. शनिवारी मोहाली जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. माध्यमे आणि ट्विटरवर प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले आहे. न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) रवतेश इंदरजितसिंग यांच्यापुढे २३ मे रोजी सुनावणी होईल. याप्रकरणी बग्गा हे अटक टाळत असून तपास आणि न्याय होण्याच्या दृष्टीने हे अजामीनपात्र वॉरंट काढणे आवश्यक ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करावे, असा आदेश त्यात देण्यात आला आहे. 

पंजाब सरकारची हेबिअस कॉर्पस याचिका

न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे की, मोहालीचे पोलीस उपअधीक्षक सुखनाझसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दाखल झालेला एफआयआर रद्द  करण्यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयात १० मे पर्यंत प्रलंबित राहणार आहे. बग्गा यांना अटक करण्यास कोणताही प्रतिबंध केलेला नाही, किंवा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयापुढे नाही. पंजाब सरकारने याप्रकरणात केलेली हेबिअस कॉर्पस याचिकासुद्धा उच्च न्यायालयापुढे आहे. पाच नोटिसा बजावूनही बग्गा पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. बग्गा यांना पंजाब पोलिसांनी दिल्लीत अटक करून स्थानिक पोलीस ठाण्यात नेले असता दिल्ली पोलिसांनी त्याची नोंद केली नाही. त्यानंतर आरोपीला मोहाली न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात असताना पंजाब पोलिसांना कुरुक्षेत्र येथे अडवून हरियाणा पोलिसांनी ठाणेसर सदर पोलीस ठाण्यात नेले. तेथे दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त प्रशांत गौतम यांनी त्यांच्या पोलिसांकरवी बग्गा यांची बळाने आणि बेकायदा सुटका करून घेतली.

दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा कवच

नवी दिल्ली : ज्यांच्या अटकेवरून पंजाब, दिल्ली व हरियाणा पोलिसांमध्ये वाद झाला ते भाजपचे नेते ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केल्यानंतर, आम्ही त्यांच्यासाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था पुरवू, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी सांगितले. शुक्रवारी पंजाब पोलिसांनी बग्गा यांना दिल्लीच्या जनकपुरी भागातील त्यांच्या घरून अटक केली, मात्र आपल्या पंजाबच्या समपदस्थांनी या अटकेबाबत आपल्याला माहिती न दिल्याचे सांगून दिल्ली पोलिसांनी त्यांना हरियाणातून राजधानीत परत आणले होते.

 ‘बग्गा यांनी त्यांची सुरक्षा व सुरक्षितता याबाबत काळजी व्यक्त केली. आम्ही योग्य ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देऊ’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  ‘सकाळी ८ वाजताच्या सुमारास काही लोक आमच्या घरी आले व माझ्या मुलाला घेऊन गेले’, या बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.