कोण होणार पंजाबचे नवे ‘कॅप्टन’; मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसने बोलावली बैठक, सिद्धू यांचंही नाव चर्चेत

काँग्रेस पार्टीच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

sidhuu
(पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही बैठक थोड्याच वेळात चंदीगडमध्ये होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर दोन उपमुख्यमंत्र्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात आणि शपथविधी सोहळा सोमवारी होण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पंजाब काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याची विनंती करणारा ठराव एकमताने मंजूर केला होता. ही बैठक राहुल गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झाली.

कोणाला मिळू शकतं मुख्यमंत्रीपद?

मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंबिका सोनी, तृप्त राजिंदर सिंग बाजवा, ब्रह्म मोहिंद्रा, विजय इंदर सिंगला, पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलजीत सिंह नागरा आणि खासदार प्रताप सिंह बाजवा यांच्या नावाची देखील चर्चा आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी जे नाव समोर येतंय ते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजकुमार वेरका. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आल्यास ते दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतील.

दरम्यान, काँग्रेसच्या शक्तिशाली अशा प्रादेशिक नेत्यांपैकी एक असलेले अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. ‘‘हा माझा पंजाब आहे. मी माझ्या राज्यासाठी शक्य ते सर्व केले. मी गेली ५२ वर्षे राजकारणात आहे, यापुढेही राहीन. मी राजीनामा दिला आहे; परंतु राजकारणात पर्याय कधीच संपत नाहीत,’’ असे अमरिंदर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New punjab cm will be chosen in congress meeting sunil jakhar sidhu ambika soni names in fray hrc

ताज्या बातम्या