पीटीआय, नवी दिल्ली
रेल्वेचे तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्याच्या निकषांत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार आता गाडी सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केले तरच प्रवाशांना परतावा मिळणार आहे. सध्या यासाठी चार तासांचा निकष आहे. हे बदल १ ते १५ एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व गाड्यांसाठी लागू केले जाणार आहेत.

नवीन निकषानुसार गाडी सुटण्याच्या ८ ते २४ तासांआधी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के परतावा रक्कम दिली जाईल. सध्या हा कालावधी ४ ते १२ तास असा आहे. त्यामुळे अचानक तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना मोठा भूर्दंड बसणार आहे. गाडीच्या २४ ते ७२ तासांआधी तिकीट रद्द केल्यास ७५ टक्के परतावा रक्कम दिली जाणार असून सध्या १२ ते ४८ तासांसाठी या प्रमाणात परतावा दिला जातो. तीन दिवस अर्थात ७२ तासांआधी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण रक्कम परत केली जाणार आहे. हा निकष पूर्वी दोन दिवस अर्थात ४८ तासांचा होता. हे निकष वंदे भारतमधील शयनयान आणि अमृत भारतमधील द्वितीय श्रेणीच्या आरक्षणासाठी जानेवारीपासूनच लागू करण्यात आले आहेत. आता त्याची सर्व रेल्वेगाड्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे.

प्रवासाची श्रेणी आणि गाडीत चढण्याचे ठिकाण बदलण्यासाठीही नवा निकष लागू होणार आहे. त्यानुसार गाडीच्या वेळेआधी अर्ध्या तासापर्यंत हा बदल करता येईल. सध्या गाडीची पहिली आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतरच ही मुभा होती. ही यादी सर्वसाधारणपणे आठ तास आधी जाहीर केली जाते.

तिकीट आरक्षणातील गैरप्रकार आणि एजंटकडून शेवटच्या क्षणी होत असलेल्या तिकीट विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत ३ कोटींहून अधिक संशयास्पद युजर आयडीची नोंदणीही रद्द करण्यात आली आहे. – अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री