२,३७,७३,०००

दैनंदिन लसीकरणाचा एक कोटीचा टप्पा एका महिन्यात चौथ्यांदा गाठला गेला.

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात शुक्रवारी एका लसलाभाथ्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा परिधान करून लस घेतली.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नवा लसविक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवशी, शुक्रवारी दैनंदिन लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. संपूर्ण देशभर दोन कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या.

देशात शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसमात्रा देण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसमात्रांची संख्या ७९ कोटी १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी देशाचे नागरिक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने वाढदिवसाची भेट देण्यात आली’’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केली. देशाने शुक्रवारी एका दिवशी दोन कोटींहून अधिक लसमात्रा देऊन लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

दैनंदिन लसीकरणाचा एक कोटीचा टप्पा एका महिन्यात चौथ्यांदा गाठला गेला. शुक्रवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत एक कोटी लसमात्रा देण्यात आल्या. तेव्हाही आरोग्यमंत्र्यांनी, भारत वेगाने लसीकरण करीत असल्याचे आणि एका नव्या विक्रमाकडे वाटचाल सुरू असल्याचे म्हटले होते.

पंतप्रधान मोदी यांचा आज वाढदिवस असून  नेमका त्याच दिवशी लसमात्रांचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत सर्वांत वेगाने लसमात्रा देण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी यांना ही वाढदिवसाची भेट आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी ‘‘व्हॅक्सिन सेवा, हॅपी बर्थडे मोदी’’ या हॅशटॅगवर म्हटले आहे.

देशात ६ सप्टेंबर, ३१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट असा तीन वेळा एक कोटी लसमात्रांचा टप्पा गाठण्यात आला होता. आता पुन्हा तो पार करण्यात आला आहे.  दरम्यान, भाजपच्या सर्व शाखांनी लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपला सहप्रवास सुरू आहे… करण्यासारखे खूप काही आहे. मजबूत, समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न साकार केल्याशिवाय विश्रांती नाही. मला देशासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची शक्ती द्या!    – नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New record prime minister narendra modi birthday highest vaccination in country akp

ताज्या बातम्या