पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, सैन्य मागे घेण्यासाठी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चा सुरु आहे. पण त्याचवेळी चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागच्या आठवडयात १५ जूनच्या रात्री पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने टेहळणी चौकी उभारल्याने मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनने ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. चीन आता चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्यात आपल्याला रस आहे असे दाखवतोय, पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवरील त्यांचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. मात्र, त्यानंतर चीननं आता सैन्य देपसांग, दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये हलवलं आहे. चीन येथे सैन्य तळ उभारत असून, पुन्हा भारतीय लष्कराच्या गस्तीमध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्न करत आहे.

गलवान खोऱ्यातील सॅटलाइट फोटोमध्ये दिसणाऱ्या चिनी बांधकामाला लष्कराने दुजोराही दिलेला नाही किंवा ते फेटाळलेले सुद्धा नाही. मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने २२ जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते. १७ जून ते २२ जून या कालावधीत हे बांधकाम करण्यात आले आहे. कारण प्लॅनेट लॅबच्या १६ जूनच्या फोटोमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणी असे कुठलेही बांधकाम दिसले नव्हते.