Delhi Classroom Scam: आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरकारी शाळांमधील अतिरिक्त वर्गखोल्याच्या बांधकामात कथित भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल १२,७४८ वर्गखोल्या किंवा शाळेची इमारत बांधण्याच्या कामात कथित भ्रष्टाचार झाला आहे. या आरोपामुळे आता तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मधूर वर्मा यांनी एफआयआर दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले, केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) मुख्य तांत्रिक परीक्षकांच्या अहवालात बांधकामातील अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. सुमारे तीन वर्ष हा अहवाल टेबलाखाली दडवून ठेवण्यात आला होता. सक्षम अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या कलम १७-अ नुसार परवानगी मिळाल्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला.”

भाजपा खासदाराने दाखल केली होती तक्रार

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे काम ‘आप’ पक्षाशी संबंधित कंत्राटदारांना दिले गेले होते. कंत्राटाच्या रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली असून ठरलेल्या मुदतीच्या आत प्रकल्पाचे कामही पूर्ण झालेले नाही. प्रकल्पासाठी सल्लागार आणि वास्तुविशारदांना निहित प्रक्रियेचे पालन न करताच नियुक्त केले गेले. २०१९ साली झोन २३, २४ आणि २८ मधील सरकारी शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या बांधण्याचे काम सुरू केले होते. या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी केला होता. तसेच या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीत तिवारी यांनी म्हटले की, एका वर्गखोलीच्या कामासाठी २८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र एका वर्गखोलीच्या बांधकामासाठी केवळ ५ लाख रुपये लागतात.

निविदेनुसार, शाळेच्या एका वर्गखोलीच्या बांधकामासाठी जवळपास २४.८६ लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र दिल्लीत अशाप्रकारच्या खोल्या केवळ ५ लाखात बांधून मिळतात. या प्रकल्पाचे काम ३४ कंत्राटदारांना दिले गेले होते. यातील बहुसंख्या कंत्राटदार आप पक्षाशी संबंधित होते.