अध्यक्षपदाची चुरशीची निवडणूक हरलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर श्रीलंकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी पदाला चिकटून राहण्यासाठी सैन्याची मदत मागितली होती काय, याची चौकशी करण्यात येईल, असे नव्या सरकारने रविवारी जाहीर केले. दरम्यान, नवे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या ‘राष्ट्रीय एकतेच्या’ सरकारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नवे मंत्रिमंडळ सगळ्यात आधी अध्यक्ष राजापक्षे यांनी केलेल्या बंड आणि कटाच्या प्रयत्नांची चौकशी करेल, असे नव्या सरकारचे प्रवक्ते मंगला समरवीरा यांनी पत्रकारांना सांगितले. सैन्यप्रमुख आणि पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानंतरच राजापक्षे यांनी सत्ता सोडली, अशी माहिती त्यांनी दिली. मतमोजणी सुरू होती त्या रात्री काय घडले हे आम्ही लोकांना सांगायला हवे. सत्तांतर शांततेने  झाले असे लोकांना वाटत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे समरवीरा म्हणाले.
दरम्यान, श्रीलंकेचे नवे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी निवडणूक जिंकल्यानंतर कँडी येथे केलेल्या पहिल्याच भाषणात सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या ‘राष्ट्रीय एकता सरकार’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आणि सर्व अल्पसंख्याकांचा योग्य सन्मान राखून धार्मिक ऐक्यासाठी काम
करण्याची हमी दिली.