दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी लवकरच सामान्यांच्या स्वयंपाक घरात दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून, या महिन्यातच मॅगीचे पॅकेट्स किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे नेसले कंपनीने स्पष्ट केले.
मोनोसोडियम ग्लुटामेटचे (एमएसजी) प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा जास्त असल्याचा ठपका ठेवत सरकारने मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली होती. यानंतर विविध चाचण्यांचे अहवाल आल्यावर न्यायालयाकडून बंदी उठविण्यात आली होती. सरकारने अधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमधून मॅगीचे नमुने तपासण्यात आले असून, ते खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आता मॅगी बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केल्याचे नेसलेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील आणि परदेशातील अधिकृत प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या २० कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. सर्व नमुन्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे या महिन्यातच मॅगी भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ज्या राज्यांमध्ये यासाठी विशेष परवानगी घेण्याची गरज आहे. तिथेही ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येते आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार तीन प्रयोगशाळांमधील चाचण्याही सकारात्मक आल्याचे नेसले कंपनीकडून गेल्याच महिन्यात सांगण्यात आले होते.