करोनाच्या नव्या प्रकाराने ब्रिटनची कोंडी केली आहे. आढळून आलेल्या या विषाणूमुळे ब्रिटन पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये गेलं आहे. तर जगभरातील राष्ट्रांचीही चिंता वाढली आहे. भारताने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असून, आणखी एक समाधानाची बाब म्हणजे करोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण देशात अजूनही आढळलेला नाही, मात्र चिंता कमी झालेली नाही. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या विषाणूचं संक्रमण झालेले अनेक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे जगातील इतर राष्ट्रांनी ब्रिटनहून येणारे हवाई मार्ग बंद केले आहेत. भारतातही सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, देशात अद्याप करोनाचा नवीन प्रकार आढळून आलेली नाही. याविषयी आजतकशी बोलताना एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : काय आहे करोनाचा नवा प्रकार?

गुलेरिया म्हणाले,”भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघण्याची गरज पडणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचं जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. त्याचबरोबर त्यांच्या हा विषाणू आढळून आला, तर त्यांचं विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये,” अशी खबरदारी घेण्याचं आवाहन गुलेरिया यांनी केलं आहे.

आणखी वाचा- करोनाचा नवा प्रकार जास्त घातक? लस प्रभावी ठरणार का?

गुलेरिया म्हणाले,”ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हे करोना विषाणूचं नवं स्वरूप आहे. लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. जिथे हा विषाणू आढळून आला, तिथे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. यातून हे दिसून आलं आहे की, हा विषाणू वेगानं पसरत चालला आहे. पण, रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर पसरत आहे, त्यामुळे जिथे हा विषाणू पोहोचेल तिथे रुग्णसंख्या वेगानं वाढू शकते. त्यामुळे ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्यात आली आहे आणि तिथून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवली जात आहे,” अशी माहिती गुलेरिया यांनी दिली.