हेरगिरीचा आरोप आणि रॉचे कथित एजंट असलेल्या कुलभूषण जाधव यांची आणि त्यांच्या आई व पत्नीची भेट सोमवारी इस्लामाबादमध्ये झाली. त्यानंतर लगेचच पाकिस्तानने एक नवा व्हिडिओ प्रसारीत केला. या व्हिडिओत कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. मी पाकिस्तान सरकारला आई आणि पत्नीला भेटण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य करून पाकिस्तान सरकारने आमची भेट घडवून आणली त्यामुळे मी पाकिस्तान सरकारचा आभारी आहे असे कुलभूषण जाधव यात म्हणताना दिसत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट्स केले आहेत. हा व्हिडिओ काही वेळापूर्वीच पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करण्यात आला.

पाहा व्हिडिओ-

हेरगिरी केल्याप्रकरणी आणि बलुचिस्तानमध्ये विध्वंसक कारवाया केल्याप्रकरणी कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली. ते रॉचे एजंट आहेत असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. मात्र मे २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या फाशीला स्थगिती दिली. वर्ष संपण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच कुलभूषण जाधव त्यांच्या कुटुंबियांना भेटले. दिवसभरातली ही एक महत्त्वाची बातमी आहे. या भेटीनंतर तातडीने पाकिस्तान सरकारने नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत.