Delhi Hotel Fire Video updates from Malviya Nagar Fire Accident scene: दक्षिण दिल्लीमधील मालवीय नगर येथील दाट लोकवस्तीच्या हौझ राणी परिसरात असलेल्या फ्लोरीश स्टे या हॉटेलला बुधवारी भीषण आग लागली. या आगीत १२ विदेशी आणि ९ भारतीय अशा २१ नागरिकांचा मृत्यू झाला. हॉटेलच्या मालकावर निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. ही दुर्घटना घडत असताना हॉटेलमधील पर्यटक खिडक्यांमधून मदतीसाठी धावा करत असल्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
फ्लोरीश स्टे हॉटेलच्या समोर असलेल्या एका घरातील रहिवाशाने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. ज्यामुळे या घटनेची भयानकता दिसून येत आहे.
व्हिडीओ चित्रित करणाऱ्या रहिवाशाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, सकाळी साडे आठच्या सुमारास आम्हाला काहीतरी जळत असल्याचा वास आला. सुरुवातीला आम्हाला वाटले की, वास आमच्याच घरातून येत आहे. मग आम्हाला बाहेर ठिणग्या दिसल्या.

या रहिवाशाने पुढे सांगितले की, हा खूपच धक्कादायक प्रकार होता. आम्हाला आगीत फसलेल्या लोकांची मदत करायची होती. पण माझे वडील हृदयविकाराचे रुग्ण असल्यामुळे आणि धुरामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, याची आम्हाला काळजी वाटत होती. म्हणून आम्हाला बाहेर पडता आले नाही.
“आमच्या डोळ्यांदेखत लोकांना मदतीसाठी किंचाळताना पाहणे खूप हृदयद्रावक होते. पोलिसांनी अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्यापैकी काहींच्या कपड्यांवर सगळीकडे रक्त लागले होते. पोलीस आणि काही स्थानिक रहिवाशांनी पर्यटकांना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले”, असेही या रहिवाशाने सांगितले.
Horrifying visuals of rescue aided by residents in Malviya Nagar after the fire in the Hotel. Individuals, in desperate attempt had to jump from second & third floors to save themselves. Total death toll stands at 21, with 18 foreign nationals among deceased pic.twitter.com/HLLfui4OcC
— Simran (@SimranBabbar_05) June 3, 2026
व्हिडीओमध्ये काय दिसले?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आगींच्या लोळांनी वेढलेल्या हॉटेलमधील खिडक्यात अनेक पर्यटक दिसत आहेत. मदतीसाठी हताश होऊन ते मदतीची याचना करताना दिसले. एका खिडकीतून एक विदेशी महिला हेल्प, हेल्प… असे ओरडत होती. तर इतर खिडक्यांमधून पर्यटक बाहेर मदतीची वाट पाहत होते.
या व्हिडीओत पुढे दिसते की, एक आफ्रिकन महिला सांडपाण्याच्या पाईपला धरून खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. तर खोलीतील एक पुरुष तिला पडण्यापासून वाचविण्यासाठी धरून ठेवत असतो.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ ४६ वर्षीय स्थानिक रहिवासी अंजुम यांनी काढला होता. अंजुम पुढे म्हणाल्या, मी अनेक वर्षांपासून हौझ राणीमध्ये राहत आहे. पण बुधवारी जे आम्ही पाहिले, त्याने मला धक्काच बसला. आपत्कालीन सेवांना निमुळत्या गल्ल्यांमुळे घटनास्थळी पोहचायला बराच वेळ लागला.
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, हॉटेलची संपूर्ण इमारत धुराने वेढली आहे. अनेक पर्यटक हॉटेलच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावत आहेत. आगीने विक्राळ स्वरुप धारण केलेले असताना अग्निशमन दल किंवा पोलीस दिसत नाहीत. पर्यटकांनी खिडक्यांतून उड्या मारण्याचे आवाहन स्थानिक रहिवासी करत असल्याचे ऐकू येते.
स्थानिक रहिवासी रियाझुद्दीन मन्सूरी आणि त्यांचा मुलगा अरमान यांनी हॉटेलमधील पर्यटकांना वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वरून उड्या मारणाऱ्या लोकांसाठी गादी तयार केल्या. यासाठी त्यांनी जळत्या इमारतीबाहेर सुमारे २० ते २२ गाद्या पसरवल्या होत्या.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शिडीच्या साहाय्याने जवळच्या खिडकीतून एका महिलेला खाली सुरक्षितपणे उतरवताना दिसून येतो. खाली उतरत असताना महिलेचा पाय घसरतो आणि ती खाली जमलेल्या लोकांच्या घोळक्यात पडते.
व्हिडीओच्या शेवटी शॉर्ट सर्किट होऊन आगीने विक्राळ स्वरुप घेतल्याचे दिसून येते. विजेच्या तारांमुळे आग आणखी भडकते.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे घुसमट होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर जवळपास ३५ जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मॅक्स हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, १३ विदेशी नागरिकांसह १५ जण रुग्णालयात दाखल आहेत. सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर असून नऊ रुग्णांवर आयसीयू आणि हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
६ खोल्यांची परवानगी, पण उभारल्या २८ खोल्या!
या हॉटेलला केवळ ६ खोल्या चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मालकाने नियमांचे उल्लंघन करत तिथे तब्बल २८ खोल्या बांधल्या होत्या. अग्निकांड घडले तेव्हा या २८ पैकी १८ ते १९ खोल्यांमध्ये पर्यटक मुक्कामासाठी थांबले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेड अँड ब्रेकफास्ट योजनेच्या अंतर्गत हॉटेलची उभारणी करण्यात आली होती. या योजनेच्या नियमांनुसार, नोंदणीकृत आस्थापनांना जास्तीत जास्त ८ खोल्या आणि १६ खाटांचीच परवानगी असते. त्यामुळे या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असून प्रशासकीय देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हॉटेल मालक लवकेश बजाजला अटक
हॉटेलचा मालक लवकेश बजाजला पोलिसांनी अटक केली आहे. २०२२ साली ६० वर्षीय लवकेश बजाज यांनी दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर येथील हौज राणी या छोट्याशा गल्लीतील तीन मजली इमारत विकत घेतली. या इमारतीचे ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनेत रूपांतरित करण्याचा विचार त्यांनी केला. यानंतर त्यांनी इमारतीला फ्लरीश बी अँड बी असे नाव दिले.
