लाच स्वीकारल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना २४ तासांच्या आत अटक करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने पाकिस्तान नव्या अस्थिरतेच्या वळणावर उभा राहिला आहे. पदावरील पंतप्रधानांना अटक करण्याचा आदेश देण्याची ही पहिलीच घटना .
या खळबळजनक निर्णयाचे पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेवर काय परिणाम होणार हे अस्पष्ट आहे. तसेच सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टी नवीन पंतप्रधान निवडणार की न्यायव्यवस्थेशी संघर्षांचा मार्ग स्वीकारणार हेही अस्पष्ट आहे.  प्रांतीय व राष्ट्रीय विधानसभा विसर्जित करण्याच्या मागणीसाठी धार्मिक नेते ताहिरूल कादरी यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे देशात अस्थिर वातावरण तयार झालेले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे त्यात भरच पडणार आहे.देशातील ऊर्जा टंचाईवर मात करण्यासाठी सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टीने ऊर्जा प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय जल व ऊर्जामंत्री असताना अश्रफ यांनी असे अनेक करार केले होते. या प्रकरणाची  चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय उत्तरदायित्त्व विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याच्या चुकीच्या कारणाखाली बदली झाल्याचे सुनावणीवेळी स्पष्ट झाल्याने खंडपीठ संतप्त झाले.
योगायोग की संगनमत?
लाच स्वीकारल्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वीच अश्रफ यांना अटक करण्याचा आदेश दिल्याच्या घटनेकडे कायदेतज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. यामुळे सरकारविरोधात आंदोलन पुकारणारे कादरी व न्यायव्यवस्था यांच्या संगनमतातून हा निर्णय झाल्याची चर्चाही सुरू आहे.