अमेरिकेतील सर्वात मोठ्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरावर एक वर्षाची स्थगिती लागू करण्यात आली आहे. महापौर झोहरान ममदानी यांनी बुधवारी या निर्णयाची घोषणा केली. वर्गात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत स्पष्ट नियम तयार करण्याच्या दिशेने हे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल मानले जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त रायटर्सने दिले आहे.

सुमारे ४० एआय साधनांचा वापर थांबणार

न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांमध्ये सध्या वापरली जाणारी सुमारे ४० शैक्षणिक एआय साधने विद्यार्थ्यांसाठी थांबवण्यात येणार आहेत. या निर्णयाचा आठवी इयत्तेपर्यंतच्या सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे. मात्र, ही बंदी सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे लागू असणार नाही. हायस्कूलमधील वि .द्यार्थ्यांना काही विशिष्ट परिस्थितींमध्ये एआय साधनांचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

‘मुलांना शिक्षक आणि मानवी संवादाची गरज’

झोहरान ममदानी यांनी मुलांच्या शिक्षणात मानवी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत संबंध निर्माण करणे, इतर विद्यार्थ्यांसोबत कौशल्ये विकसित करणे आणि कठीण प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एआयवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता या निर्णयामागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांना मात्र एआय वापरण्याची परवानगी

विद्यार्थ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शिक्षकांना एआय वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. धडे तयार करणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे आणि प्रशासकीय स्वरूपाची कामे यांसाठी शिक्षकांना एआय साधनांचा वापर करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या थेट शैक्षणिक वापरावर नियंत्रण ठेवताना शिक्षकांसाठी एआयचा उत्पादकतेसाठी वापर करण्याचा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेतील इतर शहरांकडूनही एआय धोरणांचा आढावा

न्यूयॉर्कच्या निर्णयामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये एआय वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी वेग आला आहे. लॉस एंजेलिससह काही इतर शालेय जिल्हेही एआय संदर्भातील त्यांच्या धोरणांचा आढावा घेत आहेत. मात्र, न्यूयॉर्कने घेतलेली एक वर्षाची व्यापक स्थगिती आतापर्यंतच्या सर्वात कडक उपायांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. गूगल, अँथ्रोपिक आणि मायक्रोसॉफ्ट या यांसारख्या प्रमुख एआय कंपन्यांनी या निर्णयावर तातडीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

चॅटजीपीटी वर यापूर्वीही बंदी

न्यूयॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये एआय संदर्भातील निर्बंध नवीन नाहीत. चॅटजीपीटी लोकप्रिय झाल्यानंतर २०२२ मध्ये शाळांनी त्याच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. नंतर ही बंदी हटवण्यात आली आणि एआय तंत्रज्ञानाचा नियंत्रित शैक्षणिक वापर करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली.

आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या एआय वापरावर वर्षभराची स्थगिती लागू केल्याने तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर नेमका किती आणि कोणत्या पद्धतीने असावा, याबाबत अमेरिकेत सुरू असलेली चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.