अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये प्रायमरीसाठी झालेल्या निवडणुकीत शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी पाठिंबा दिलेले तिन्ही उमेदवार विजयी झाले. ही निवडणूक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निवडण्यासाठी झाली. ब्रॅड लँडर, डारियालिझा अविला शेव्हलियर आणि क्लेअर वाल्डेझ अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. यापैकी दोन उमेदवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींचा पराभव केला. ही बाब अमेरिकेच्या प्रायमरी निवडणुकांमध्ये दुर्मीळ मानली जाते.
न्यूयॉर्क हा डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’ या काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहासाठी होणार्या मध्यावधी निवडणुकीत झोहरान ममदानी यांनी पाठिंबा दिलेले लोकप्रतिनिधी विजयी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच झाल्यास ममदानी यांचे अमेरिकी राजकारणातील स्थान अधिक मजबूत होणार आहे.
ममदानी यांनी समर्थन दिलेल्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी लक्षावधी डॉलर खर्च केले होते. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. या निकालांमुळे न्यूयॉर्कमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांना ममदानी यांनी इस्रायल-हमास युद्धाबद्दल घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसते इस्रायलने गाझामध्ये वंशसंहार केल्याचा लँडर यांनी आरोप केला होता. तसेच, शेव्हलियर आणि वाल्डेझ यांच्या विजयामुळे पक्षाचा कल अधिक डावीकडे झुकवण्यात ममदानी यांना यश आल्याचे मानले जात आहे.
मातब्बरांचा पराभव
‘एनवाय-१३’ मध्ये डारियालिझा अविला शेव्हलियर यांनी पाच वेळा हाऊस सदस्य राहिलेल्या आद्रियानो एस्पायट यांना हरवले.
‘एनवाय-१०’मध्ये ब्रॅड लँडर यांनी दोन वेळा हाऊस सदस्य असलेल्या डॅन गोल्डमॅन यांचा पराभव केला.
‘एनवाय-७’मध्ये नायडिया वेलाझक्वेझ यांचा पराभव करून क्लेअर वाल्डेझ विजयी झाल्या.
हा कष्टकरी लोकांना पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणारे अधिक चांगले डेमोक्रॅटिक उमेदवार निवडण्याचा मुद्दा आहे. – झोहरान ममदानी,
महापौर, न्यूयॉर्क
