न्यूयॉर्क शहरातील गजबजलेल्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सोमवार दुपारी एका सुरीधारी महिलेने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. सुमारे चार मिनिटांच्या थरारक संघर्षानंतर पोलिसांनी गोळ्या झाडून हल्लेखोर महिलेला जागीच ठार केलं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हा हल्ला स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेचारच्या सुमारास टाइम्स स्क्वेअरमधील अत्यंत गजबजलेल्या पादचारी भागात झाला. अवघ्या २० सेकंदांच्या अंतराने हे दोन हल्ले झाले, तेव्हा या परिसरात हजारो प्रवासी, पर्यटक आणि कुटुंबे उपस्थित होती.

हल्ल्याची पार्श्वभूमी आणि पोलीस कारवाई

न्यूयॉर्क शहर पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय पामेला सिस्नेरोस नावाच्या महिलेने एका ३२ वर्षीय महिलेवर आणि ६८ वर्षीय वृद्धावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला पूर्णपणे अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय करण्यात आला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला पीडितेचा पोटात चाकू लागल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोटात चाकू लागलेला वृद्ध पुरुष सुरुवातीला गंभीर प्रकृतीत होता, मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये गुलाबी रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेली ही महिला हातात सुऱ्या घेऊन पोलिसांसमोर उभी असलेली दिसत आहे. पोलिसांनी तिला घेरलं असताना आजूबाजूला मोठी गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या गोळीबाराचा आवाज आला आणि ती महिला जमिनीवर कोसळली.

चार मिनिटे थरार

पोलीस सूत्रांनुसार, ही महिला मानसिकदृष्ट्या विचलित वाटत होती. दोन्ही पीडितांवर हल्ला केल्यानंतर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिला एनवायपीडीच्या उपकेंद्राजवळ अडवलं. तिच्याकडे दोन मोठे सुरे होते आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही तिने ते खाली टाकण्यास नकार दिला. पोलीस आयुक्त जेसिका टिश यांनी सांगितलं की, पोलिसांनी सुमारे चार मिनिटे तिला आत्मसमर्पण करण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या महिलेने पोलिसांना धमकावत म्हटलं, “मी काहीही खाली टाकणार नाही. त्यापेक्षा मी तुम्हा दोघांना जीवे मारेन. मी तुम्हाला संपवून टाकेन.”

तिला रोखण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला टेझर गनचा (विजेचा धक्का देणारे शस्त्र) वापर केला, परंतु त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तिने अंगावर मारलेले टेझरचे वायर्स काढून फेकले आणि सुऱ्या उगारत ती पोलिसांच्या दिशेने पुढे सरकू लागली. अखेर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला, यामध्ये ती जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

हल्ल्याचा कोणताही स्पष्ट हेतू नाही

सुरुवातीला ही घटना चाकू दाखवून लूटमार करण्याची असावी असा संशय होता, मात्र पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं की या हल्ल्यामागे कोणताही स्पष्ट हेतू दिसत नाही. अधिकार्‍यांनी या घटनेचा दहशतवादाशी संबंध नसल्याचं म्हटले आहे. सिस्नेरोस या महिलेला मानसिक आजाराचा इतिहास होता आणि तपास अधिकारी या हल्ल्यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

महापौर झोहरान मम्दानी यांचे वक्तव्य

न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान मम्दानी (Zohran Mamdani) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेची पुष्टी केली. सुरीधारी महिलेने टाइम्स स्क्वेअरमध्ये दोघांवर वार केले आणि पोलिसांनी टेझरचा वापर केल्यानंतर गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितलं. तातडीने कारवाई करत मोठी जीवितहानी टाळल्याबद्दल महापौर मम्दानी यांनी एनवायपीडी अधिकार्‍यांचे आभार मानले. “एका पीडितेचा आणि संशयित महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. दुसरी जखमी व्यक्ती सध्या रुग्णालयात असून तिची प्रकृती स्थिर आहे”, असं महापौर म्हणाले. यासोबतच, पोलिसांच्या गोळीबाराच्या प्रत्येक घटनेनंतर पाळल्या जाणाऱ्या नियमांनुसार या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज लवकरच सार्वजनिक केले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.