NYC Will Turn Into Mumbai: न्यूयॉर्क शहरात काही दिवसांपूर्वीच महापौर पदाच्या निवडणुकीत झोहरान ममदानी यांचा विजय झाला. भारतीय वंशाचे असलेले आणि न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांमुळे ममदानी यांना न्यूयॉर्क वासियांनी भरूभरून मतदान केले. निवडून आल्यानंतर ममदानी यांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या धोरणावर आता व्यावसायिक टीका करत आहते. ममदानींच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कला कठीण काळाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रिअल इस्टेट अब्जाधीश बॅरी स्टर्नलिच यांनी दिला. तसेच त्यांनी मुंबईचाही उल्लेख केला आहे.

झोहरान ममदानी यांनी भाडेवाड गोठविण्याची योजना आखली आहे. यामुळे न्यूयॉर्क शहरात मुंबईसारखी परिस्थिती उद्भवेल, असे बॅरी यांचे म्हणणे आहे. सीएनबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ममदानी यांच्या धोरणांवर टीका केली. समाजवादी विचारांच्या धोरणामुळे गृहनिर्माण बाजारपेठेला धक्का बसू शकतो आणि विकासक शहर सोडून जाऊ शकतात, अशीही भीती बॅरी यांनी व्यक्त केली.

मुंबईसारखी परिस्थिती का होईल?

स्टारवुड कॅपिटल ग्रुपचे सीईओ बॅरी स्टर्नलिच म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये गृहप्रकल्प उभारणे अतिशय महागडे झाले आहे. त्यात डाव्या विचारसरणीचे लोक वेडे आहेत. ते म्हणतात, भाडेकरूंनी भाडे देण्याची गरज नाही. जर भाडेकरूंनी भाडे दिले नाही तरी त्यांना बाहेर काढता येणार नाही. असे झाले तर इतर लोकही भाडे देणे बंद करतील. मग न्यूयॉर्कमध्ये मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होईल. इथेही मुंबईसारखी झोपडपट्टी निर्माण होईल.

बॅरी स्टर्नलिच त्यांच्या कंपनीचे कार्यालय आता न्यूयॉर्क शहरातून बाहेर हलविण्याचा विचार करत आहेत. न्यूयॉर्कमध्ये आता विकासकांच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. ममदानी यांनी भाडे गोठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी यावर टीका केली. शहरात भाडे गोठविण्याची नव्हे तर नवी घरे निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

ममदानी यांनी दिलेली आश्वासने काय आहेत?

ममदानी यांनी विजय मिळवल्यानंतर प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाडेवाड गोठवणे, मोफत बस प्रवास, ६ महिने ते ५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी सार्वत्रिक आणि मोफत बालसंगोपन उपक्रम तयार करणे आणि प्रत्येक परिसरात महानगरपालिकेची पाच किराणा दुकान सुरू करणे, अशी आश्वासने त्यांनी दिली होती.

समाजवाद कुठेही यशस्वी झाला नाही

बॅरी स्टर्नलिच पुढे म्हणाले की, न्यूयॉर्क शहर आता खरोखरच कठीण काळातून जात आहे. कदाचित इतिहासातून शहर काहीतरी शिकेल. ममदानींना मतदान करणाऱ्या लाखो लोकांना हे कळेल की, समाजवादामुळे पृथ्वीवर कुठेही काही काम झालेले नाही.