करोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरली आहे. याच लाटेमध्ये अगदी डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करणारी काही प्रकरणही समोर आली आहेत. असेच एक प्रकरण वाराणसीमधील काशी बनारस हिंदू विद्यापिठातील सर सुंदर लाल रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या मुलीला करोनाचा संसर्ग झाल्याचं करोना चाचणीनंतर स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या मुलीला जन्म देणाऱ्या महिलाचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. हे प्रकरण दुर्मिळ असल्याचं मानलं जात असून बाळाचा रिपोर्ट पाहून सुरुवातीला डॉक्टरही चक्रावले. मात्र बनारस हिंदू विद्यापिठातील वैद्यकीय अधिक्षकांनी असं घडू शकतं असं सांगत या नवजात बाळाची पुन्हा चाचणी करण्यासंदर्भातील शक्यता बोलून दाखवली आहे. रुग्णालयातील रजिस्टारनेही नवजात मुलगी करोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

शहरातील कॅनटॉनमेंट परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय अनिल प्रजापती यांच्या २६ वर्षीय गरोदर पत्नीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. २५ मे रोजी अनिल यांच्या पत्नीवर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही शस्त्रक्रीय करण्याआधी महिलेची करोना चाचणी करण्यात आली. अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीच्या करोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर नियोजित दिवशी म्हणजेच २५ तारखेला अनिल यांच्या पत्नीवर शस्त्रक्रीया करण्यात आली.

नक्की वाचा >> “अ‍ॅलोपॅथी डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट”; भाजपा आमदाराकडून बाबा रामदेव यांचं समर्थन

अनिल यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नव्या नियमांप्रमाणे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या करोना चाचणीसाठी सॅम्पल घेऊन ते चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी बाळाच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातील कर्मचारीही चक्रावले. बाळाची तब्बेत ठणठणीत आहे. अनिल यांनी चाचणी करताना काहीतरी गोंधळ झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

याचसंदर्भात बोलताना रुग्णालयातील अधीक्षक के. के. गुप्ता यांनी असं घडणं काही विशेष गोष्ट नाहीय. आरटी-पीसीआर चाचणीची सेन्सीटिव्हिटी ७० टक्क्यांपर्यंत असते. पुन्हा एकदा बाळाची करोना चाचणी केली जाईल. गरज पडल्यास आईची अ‍ॅण्टीबॉडी चाचणीही पुन्हा केली जाईल. या चाचणीच्या माध्यमातून बाळाच्या आईला आधीच करोनाची लागण होऊन गेली आहे का हे पाहिलं जाईल, असं गुप्ता म्हणाले. सध्या तरी आई आणि बाळाला एकत्र ठेवण्यात आलं असलं तरी पुन्हा चाचण्या केल्यानंतर जे निकाल येतील त्यावरुन या दोघांना वेगळं ठेवावं का याचा निर्णय घेतला जाणार आहे.


यापूर्वीही करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अशाप्रकारची चक्रावून टाकणारी प्रकरणं समोर आळी आहे. काही प्रकरणांमध्ये करोना चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्याचं दिसत असलं तरी रुग्णांमध्ये करोनाची सर्व लक्षणं दिसत असल्याचंही घडलं आहे. अनेकांना झालेला संसर्ग हा सीटी स्कॅनच्या मदतीने कळतो.