वृत्तसंस्था, नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युद्ध आणि दिल्लीतील हिंसाचाराचे वृत्तांकन करताना चिथावणीखोर भाषा वापरू नये, असा सल्ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील दूरचित्रवाहिनीवरील खासगी वृत्तवाहिन्यांना दिला आहे. या चित्रणातून लोकांच्या भावना भडकावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे सरकारने म्हटले आहे. माहिती आणि प्रसारण खात्याने शनिवारी यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत असे आढळून आले आहे की, अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी वृत्तांकनाच्या नावाखाली दाखविलेले प्रसंग हे दिशाभूल करणारे, भावना भडकाविणारे आहे. यासाठी या वृत्तवाहिन्यांनी वापरलेली भाषा ही सामाजिक स्तरावर स्वीकारार्ह नाही. ही भाषा सभ्यतेचे किमान निकषसुद्धा पाळत नाही. ती अश्लील आणि बदनामीकारक आहे. यातून सामाजिक द्वेष दिसून येतो. या सर्व बाबी कार्यक्रमांसाठीची नियमावलीचे उल्लंघन करतात. यातून केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा १९९५ च्या कलम २० च्या उपकलम २ मधील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. विशेषत: रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आणि वायव्य दिल्लीतील विशिष्ट घटना तसेच काही वाहिन्यांवरील वृत्त चर्चाचा याबाबत दाखला देता येईल.
२० एप्रिल रोजी एका वाहिनीने हुंकार या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेल्या वक्त्यांची भाषा असंसदीय, अवमानकारक होती. यातून विशेषत: तरुण पिढीच्या मनावर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाहिन्यांनी यापुढे आपल्याकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे माहिती व प्रसारण खात्याने बजावले आहे.
सरकारचे आक्षेप
- युक्रेन युद्धाबाबत वृ्त्तवाहिन्या या खोटे दावे करून आंतरराष्ट्रीय संस्था, अभिनेते यांची वक्तव्ये मोडतोड करून दाखवीत आहेत, तसेच बातमीशी संबंध नसलेली शीर्षके, टॅगलाइन देत आहेत.
- या वाहिन्यांचे अनेक पत्रकार आणि निवेदक यांनी कपोलकल्पित, बनावट तथ्यांबाबत विधाने करून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला.
- एका वाहिनीने १८ एप्रिल २०२२ रोजी युक्रेन मे अॅटोमी हडकंप अशी बातमी दाखवून रशिया अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला होता. यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निवेदनाबाबत दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली.
- अणुयुद्धाबाबत रशियाने युक्रेनला २४ तासांचा इशारा दिल्याचे वृत्त दाखवून एका वाहिनीने लोकांच्या मनात भय निर्माण केले.
- दिल्लीतील हिंसाचाराचे वार्ताकन करताना एका वाहिनीने दिल्ली मे अमन के दुश्मन कौन असे शीर्षक देत एक व्यक्ती तलवार नाचवत असल्याचे दृश्य वारंवार दाखविले. ही हिंसा पूर्वनियोजित असल्याचा समज होईल असे चित्रण यात होते.