काही वर्तमानपत्रे महसूल मिळवण्याच्या नादात पेड न्यूजच्या प्रभावाखाली जात आहे. ही बाब अधिक चिंताजनक असून प्रसारमाध्यमांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी केले. ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’च्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. मात्र सध्या फोफावलेल्या पेड न्यूजच्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमे ही एखाद्या ‘क्रिस्टल बॉल’सारखी आहेत. मात्र सध्या ब्रेकिंग न्यूज आणि झटपट बातम्यांचा देशावर परिणाम होत आहे. काही प्रकाशने आपला महसूल वाढवण्यासाठी पेड न्यूजसारख्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. अशा गोष्टी रोखण्याची नितांत गरज असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो जनता आणि सरकारी कर्मचारी यांच्यातील दुवा आहे. त्यामुळे जनहिताच्या गोष्टींकडे पत्रकारितेतून अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र ही कामगिरी करताना वाईट गोष्टींचा प्रभाव वाढू नये याची दखल घेण्याची गरज असल्याचेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.