पीटीआय, वॉशिंग्टन : घटणारा विकासदर आणि वाढती महागाई याचा विचार करून देशाचा आगामी अर्थसंकल्प अत्यंत काळजीपूर्वक तयार केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांसाठी आल्या असताना ब्रुकिंग्स इन्स्टिटय़ूटमध्ये एका मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

इंधनाचे चढ दर ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगत आगामी अर्थसंकल्पात विकासदरात सातत्य राखण्यावर भर राहील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले. २०२२-२३ या आर्थिक वर्षांत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर घटण्याचा अंदाज सर्व अर्थविषयक संस्थांनी व्यक्त केला असला तरी करोनाच्या साथीतून बाहेर पडल्यानंतर भारताने अधिक चांगला वेग पकडल्याचेही त्यांनी मान्य केले आहे, हे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर भडकले असताना रुपया घसरल्यामुळे आयातखर्च वाढला आहे. अद्याप अर्थसंकल्पाला अवधी असला तरी या सगळय़ाचा विचार करून त्याची आखणी केली जाईल, असे त्यांनी यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांचा भारत दौरा

अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी पुढल्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी वॉशिंग्टन इथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य बैठकीसाठी येणार असल्याचे येलेन यांनी जाहीर केले. अर्थमंत्री या नात्याने त्यांचा हा पहिला भारत दौरा असेल.