देशातील जवळपास ११ हजार कर्मचारीविहीन रेल्वे फाटकांवर काम करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध करून द्यावेत, असे नागरी सेवा दले, स्वयंसेवी संस्था, सामाजिक-राजकीय संघटनांना सांगण्यात आल्याची माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली.
याबाबत जाहिराती देऊन नागरी सेवा दले, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक-राजकीय संघटनांकडून स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
लोहमार्गावर अपघात होऊन त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत १८ हजार ७३५ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यापैकी पाच हजार जण एकटय़ा उत्तर रेल्वे परिमंडळातील अपघातात मृत्युमुखी पडले आहेत, असेही प्रभू म्हणाले.
निर्मनुष्य रेल्वे फाटकांजवळ गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात करण्यात येऊ शकते का, याची पडताळणीही करण्यात येत आहे. आर्थिक प्रश्नामुळे देशातील प्रत्येक निर्मनुष्य रेल्वे फाटकावर पहारा ठेवणे रेल्वेला शक्य झालेले नाही. त्यामुळेच त्यासाठी बाहेरून स्रोत मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.