कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) गंभीर दखल घेतली आहे. एनजीटीने या वर्षी ३१ मार्चपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गंगेत तरंगणारे आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मानवी मृतदेहांच्या संख्येबाबत दोन्ही राज्य सरकारांकडून माहिती मागवली आहे.

पडताळणी अहवाल सादर करण्याचे आदेश
न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि अतिरिक्त मुख्य सचिव, यूपी आणि बिहारचे प्रधान सचिव (आरोग्य) यांना या विषयावर तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. करोना महामारी सुरू झाल्यानंतर किती मानवी मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत तरंगताना दिसले, अशी विचारणा खंडपीठाने केली आहे.

गंगेकिनारी मृतदेह पुरणे थांबण्यासाठी जनजागृती
तसेच, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सरकारने किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा पुरण्यासाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली? याचीही विचारणा करण्यात आली होती. गंगा नदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेह पुरण्यासारख्या गोष्टी थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत का? याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे.