NHAI Rs 350 Monthly Toll Pass eligibility and online apply process : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील १२१ टोल प्लाझावर आपली डिजिटल ‘फास्टॅग स्थानिक पास’ (FASTag Local Pass) सुविधा विस्तारली आहे. यामुळे पात्र स्थानिक वाहनधारकांना मासिक पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या नवीन सुविधेमुळे आता स्थानिक प्रवाशांना मासिक पास मिळवण्यासाठी स्वतः टोल प्लाझावर जाण्याची किंवा कागदपत्रे प्रत्यक्ष जमा करण्याची गरज भासणार नाही. यासाठी ‘राजमार्गयात्रा’ या मोबाईल ॲपद्वारे अर्ज करता येऊ शकतात. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर आणि नागरिक-स्नेही बनवणं हा या सुविधेचा मुख्य उद्देश असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
३५० रुपयांचा हा मासिक पास कोणाला मिळू शकतो?
टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिघात राहणारे स्थानिक रहिवासी या स्थानिक पाससाठी पात्र आहेत. पात्र प्रवाशांना या पासच्या माध्यमातून संबंधित टोल नाक्यावरून एका महिन्यात नियमांच्या अधीन राहून अमर्याद वेळा प्रवास करता येईल. ३५० रुपयांपासून सुरू होणारा हा मासिक पास अशा लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, जे नोकरी-व्यवसाय, रोजची कामे किंवा इतर नियमित प्रवासासाठी एकाच टोल नाक्यावरून सतत ये-जा करतात. परंतु, ही सुविधा सर्वच टोल नाक्यांवर उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनधारकांनी त्यांचा टोल नाका या १२१ टोल नाक्यांच्या यादीत समाविष्ट आहे की नाही, हे आधी तपासून घेणं आवश्यक आहे.
‘राजमार्गयात्रा’ ॲपद्वारे अर्ज कसा करावा?
पास मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. पात्र नागरिक ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपवरून या स्थानिक पाससाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या निवेदनानुसार, अर्जदाराचा पत्ता, वाहनाचा तपशील आणि लिंक असलेला फास्टॅग तपासण्यासाठी ही यंत्रणा डिजिलॉकर आणि वाहन यांसारख्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करते. यानंतर, अर्जदाराचा नोंदणीकृत पत्ता टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात येतो की नाही, हे तपासण्यासाठी ‘जीआयएस’ आधारित पडताळणी केली जाते. यामुळे जर माहिती डिजिटल स्वरूपात पडताळली गेली, तर नागरिकांना रहिवासी पुराव्यासाठी वेगळी कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.
कोणती कागदपत्रे आणि तपशील तपासले जातात?
अर्जदाराच्या संमतीनंतर ही डिजिटल यंत्रणा सरकारी डेटाबेसमधून माहिती गोळा करते, रहिवासी पत्ता, वाहनाचा तपशील, वाहनाला लिंक असलेला फास्टॅग (FASTag), नोंदणीकृत पत्ता आणि टोल प्लाझा.अंतरमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, डिजिटल रेकॉर्ड आणि जीआयएस पडताळणीमुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी आणि मॅन्युअल पडताळणीची गरज पूर्णपणे संपली आहे
हा डिजिटल स्थानिक पास कुठे उपलब्ध आहे?
NHAI ने ही सुविधा भारतातील १२१ टोल प्लाझावर लागू केली आहे. नागरिक अर्ज करण्यापूर्वी ‘राजमार्गयात्रा’ पोर्टलवर जाऊन या टोल नाक्यांची यादी पाहू शकतात. या सुविधेची सुरुवात सर्वप्रथम जुलै २०२६ मध्ये दिल्लीतील ‘अर्बन एक्सटेंशन रोड-II’ (UER-II) वरील मुंडका-बक्करवाला टोल प्लाझा येथे करण्यात आली होती. या यशस्वी प्रयोगानंतर NHAI ने याचा विस्तार १२० हून अधिक टोल नाक्यांवर केला आहे. आगामी महिन्यांत इतरही टोल प्लाझावर ही सुविधा सुरू केली जाईल, असं सरकारने म्हटले आहे.
NHAI ने ही ऑनलाइन यंत्रणा का सुरू केली?
यापूर्वी, स्थानिक पास मिळवण्यासाठी लोकांना संबंधित टोल प्लाझावर जाऊन स्वतःचं घर २० किमीच्या परिघात असल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रे जमा करावी लागत असत. ही नवीन डिजिटल यंत्रणा कागदी काम कमी करण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा उपक्रम ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा आणि नागरिकांचे जीवन सुकर करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि पात्रता ठरवण्याची प्रक्रिया अधिक अचूक बनेल. नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी ३५० रुपयांचा मासिक पास दरमहा प्रत्यक्ष रांगेत उभे न राहता टोल व्यवस्थापनाचा एक सोपा पर्याय ठरत आहे.
