श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सोमवारपासून जोरदार तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुरावे संकलित केले. तसेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात यश आलेले नाही.

गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक डॉक्टर आणि सहा मजूर ठार झाले. गुंड येथे बोगदा प्रकल्पावर काम करत असलेले मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीवर परतल्यानंतर किमान दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संशयित दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांचा शोध घेण्यासाठी लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांनी छावणी आणि बोगद्याच्या आजूबाजूला शोधमोहीम हाती घेतली आहे. रविवारचा हल्ला बिगरकाश्मिरींवर झालेल्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी जून २००६मध्ये दहशतवाद्यांनी बिहार आणि नेपाळमधून आलेल्या मजुरांना ठार केले होते. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांपैकी कोणालाही अटक करण्यात यश आलेले नाही. पण दहशतवाद्यांपर्यंत नेणारे काही महत्त्वाचे सुगावे मिळतील अशी आशा असल्याचे अधिकारी म्हणाले.

हेही वाचा >>> India China LAC : भारत-चीनमधील संघर्ष मिटणार? LAC बाबत महत्त्वाचा करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!

हल्ल्याचा सर्वत्र निषेध

दहशतवादी हल्ल्याचा विविध राजकीय पक्षांकडून निषेध केला जात आहे. आम्ही दहशतवादाविरोधातील लढाईत एकत्र आहोत असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. तर, तर, या हल्ल्याचे सुरक्षा दले बदला घेतील असे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले. या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानशी चर्चा शक्य नसल्याचे सांगितले.

काश्मीरचा पाकिस्तान होणार नाही. या हल्ल्यात उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करणारे गरीब मजूर आणि आमच्या एका डॉक्टरची हत्या झाली आहे. असे करून या दहशतवाद्यांना काय मिळणार आहे? जवळपास ३० वर्षांपासून आम्ही दहशतवाद सहन करत आहेत. अशा वातावरणात चर्चा कशी होणार? आधी लोकांना मारणे थांबवा. – फारुख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स

आम्ही गांदरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. अशा अमानवी आणि घृणास्पद हिंसाचारामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारण्यात भारताला कोणीही नाउमेद करू शकत नाही. एक देश म्हणून दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही एकत्र आहोत.

मल्लिकार्जुन खरगेकाँग्रेस अध्यक्ष

Story img Loader