NIA chargesheet Pahalgam terror attack: काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक स्थानिक आणि २५ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष हल्ला होण्यापूर्वी एक आठवड्याअगोदर पासूनच या हल्ल्याचा कट रचला जात होता अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेला हल्ला १५ एप्रिलपासूनच सक्रिय होता अशी माहिती एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात दिल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिल आहे.
१५ एप्रिलपासूनच सुरु होता कट
एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२५ रोजी श्रीनगरमध्ये भारताने राबवलेल्या ऑपरेशन महादेव दरम्यान एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्या फोनमध्ये १५-१६ एप्रिलच्या वेळेची नोंद असणारे नकाशाचे दोन स्क्रीनशॉट्स सापडले आहेत. यात बैसरन येथील ठिकाणे दाखविण्यात आली आहेत. मोबाईल ॲपमध्ये हे पॉइंट्स मार्क करुन ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानस्थित हँडलर साजिद जट याच्याकडून मिळालेल्या कोऑर्डिनेट्सशी हे पॉइंट्स जुळत होते. दहशवाद्यांनी केलेल्या वेळेच्या नोंदींवरुन हा कट १५ एप्रिलपासूनच केला जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.
कोऑर्डिनेट्ससाठी ट्रेकिंग ॲपचा वापर
दहशतवाद्यांनी जीपीएस-आधारित मोबाईल ॲपचा वापर केला होता. ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपचा मदत त्यांनी लोकेशन ट्रॅक करण्यासाठी आणि कोऑर्डिनेट शेअर करण्यासाठी केला होता, असे NIA च्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान, २८ जुलै रोजी श्रीनगरजवळील दाचीगाम जंगलात फैसल जट ऊर्फ सुलेमान, हबीब ताहिर ऊर्फ जिब्रान आणि हमझा अफगाणी हे तीन दहशतवादी ठार झाले होते. एनआयएच्या तपासानुसार, या तिघांनी २१ एप्रिल रोजी परवेझ अहमद या स्थानिकाच्या घरात आश्रय घेतला होता. परवेझ आणि त्याचे काका बशीर अहमद जोथड यांच्यावर हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांना अन्न आणि आश्रय दिल्याचा आरोप आहे.
चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर
जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमधील डेटाच्या विश्लेषणातून दहशतवाद्यांचे अनेक फोटो, दहशतवादी हँडलर अली साजिद ऊर्फ अली भाई याच्या बरोबरच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स, बैसारन पार्क, पहलगामजवळील कोऑर्डिनेट दाखवणाऱ्या ॲपचे स्क्रीनशॉट्स आढळून आले आहेत. तसेच, पाकिस्तानी नागरिक साजिद हा लष्कर-ए-तोयबा आणि द रेसिस्टन्स फ्रंट दहशतवादी संघटनेचा कमांडर असल्याचे समोर आले आहे. साजिदने या हल्ल्यात पाकिस्तानात बसूनच दहशतवाद्यांना मदत केल्याची एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले फोन देखील पाकिस्तानातील असल्याचे समोर आले आहे. एनआयएने तपासादरम्यान १,१०० हून अधिक साक्षीदारांची चौकशी केल्याचे एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
