राष्ट्रीय तपास संस्थेची माहिती
काँग्रेसच्या नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला करून छत्तीसगढमधील महत्त्वाच्या नेत्यांना जिवे मारणाऱ्या दोन नक्षली म्होरक्यांची राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) ओळख पटली आह़े  छत्तीसगढमधील दर्भा खोऱ्यात गेल्या वर्षी केलेल्या हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप त्यांच्यावर आह़े
दर्भा विभाग माओवादी समितीचा प्रमुख सुरेंद्र आणि उपप्रमुख जयलाल यांनीच राज्यातील काँग्रेस नेतृत्व संपविणाऱ्या या हल्ल्याची योजना आखली आणि अंमलबजावणीत पुढाकार घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े  महत्त्वाचा नक्षली नेता जी़  व्ही़  के. प्रसाद उपाख्य गुदसा उसेंदी याच्या एनआयएने केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आह़े  
४५ वर्षीय प्रसाद आणि त्याची पत्नी संतोषी मार्कम यांनी ७ जानेवारी रोजी आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होत़े  त्यानंतर एनआयएने त्याची पोलीस कोठडी घेतली होती. इतर नक्षली कॅडेट्सच्या साहाय्याने सुरेंद्र आणि जैलाल यांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती चौकशीदरम्यान एनआयएला दिल्याचे कळत़े  त्यानुसार या दोन म्होरक्यांचा शोध  घेण्यात आल्याचेही स्पष्ट झाल़े
सुकमा जिल्ह्यात २५ मे २०१३ रोजी झालेल्या हल्ल्यात २७ जण मारले गेले होत़े  त्यात नक्षलविरोधी मोहीम सलवा जुडूमचे संस्थापक महेंद्र कर्मा आणि छत्तीसगढ काँग्रेसचे प्रमुख नंदकुमार पटेल यांचाही समावेश होता़  तसेच याच हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचाही नंतर मृत्यू झाला होता़