राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आज पुन्हा ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. एनआयए आणि इतर तपास यंत्रणांकडून या कट्टरपंथी संघटनेविरोधात कारवाई करण्यात येत आहे. तपास यंत्रणांकडून देशातील आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. कर्नाटकमधून पीएफआयच्या ४५ सदस्यांना यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. या सदस्यांना स्थानिक तहसीलदारांपुढे हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. पुण्यातूनही पोलिसांनी पीएफआयच्या सहा समर्थकांना ताब्यात घेतले आहे.

पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, मध्यरात्री औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई

“पीएफआयवर पहिल्यांदा छापेमारी करण्यात आल्यानंतर या संघटनेच्या सदस्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली होती. या चौकशीच्या आधारे एनआयए आणि पोलिसांकडून देशातील आठ राज्यांमध्ये छापेमारी करण्यात येत आहे”, अशी माहिती एनआयए सूत्राने दिली आहे. आसाममध्ये पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास करण्यात आलेल्या छापेमारीत पीएफआयच्या सात सदस्यांना अटक करण्यात आली आहे. कामरुप जिल्ह्यातील नागारबेरामधून या सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान!

सोमवारी रात्रीपासून उत्तर प्रदेशातील सिआना, सरुरपूर आणि मेरठच्या लीसरी गेट परिसरात छापेमारी करण्यात येत आहे. मेरठ, बुलंदशहर आणि सीतापूरमधून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीच्या शाहीन बाग आणि जामियामध्येही तपास यंत्रणांकडून छापेमारी केली जात आहे. या छापेमारीदरम्यान १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास यंत्रणांसह पोलिसांच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, २२ सप्टेंबरला एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाकडून देशातील १५ राज्यांमधील ९३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत पीएफआयच्या १०० सदस्यांना अटक करण्यात आली होती.