मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातल्या मोरवा येथील मिस प्रिटी इंडिया विनर असलेली निधी तिवारी या मुलीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. निधी तिवारी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तिचे फेसबुकवर ९ लाख तर इन्स्टाग्रामवर ७ लाख फॉलोअर्स होते. निधीला अभिनयाच्या क्षेत्रात जायचं होतं आणि नशीब आजमावयाचं होतं. पण तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

आत्महत्येपूर्वी निधी तिवारीची फेसबुक पोस्ट

आत्महत्या करण्यापूर्वी तिने फेसबुकवर एक भावूक पोस्ट लिहिली होती. ती म्हणाली होती अधूरे दिल को किसी से पूरा नहीं किया, मैने खुद से पूर कर दिया. इसलिये कहा जाता है खुद से प्यार करतो, किसी और से नही. खुद में खुद को तलाश करो, किसी और में आखिर कब तक तलाशोगे खुदको. अशा ओळी तिने शेअर केल्या होत्या. निधी तिवारीची आई लता यांनी सांगितलं की शनिवारी रात्री ८ सुमारास निधीचा आणि दिल्लीत राहणाऱ्या सोनू सिंह नावाच्या तरूणाशी तिचा फोनवर वाद झाला होता. त्यानंतर ही पोस्ट निधीने केली होती. तसंच तिने तिच्या खोलीचं दार लावून घेतलं. तिची आई म्हणाली मी रात्री ९ च्या च्या दरम्यान तिला जेवायला हाक मारली जेव्हा ती येणार नाही असं म्हणाली. तसंच मला काही वेळ एकटं राहुदेत असंही तिने सांगितलं. यानंतर रात्री आम्ही झोपायला गेलो. रविवारी सकाळी निधीने बराच वेळ तिच्या खोलीचं दार उघडलं नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं की निधीने काही टोकाचं पाऊल तर उचललं नाही ना? त्यामुळे आम्ही पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी खिडकीतून पाहिलं तर तिचं शरीर पंख्याला लटकत होतं. तिने गळफास घेतला होता. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टारंनी तिला मृत घोषित केलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

निधीचे शेजारी भुपेंद्र सिंह यांनी काय सांगितलं?

निधीचे शेजारी भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं की निधीन तिची आई आणि लहान बहीण यांच्यासह राहात होती. निधीचे वडील अशोक तिवारी हे मागील १५ वर्षांपासून त्यांच्यापासून वेगळे राहतात. निधीला एक मोठी बहीण होती तिने पाच वर्षांपूर्वी छतावरून उडी मारत आत्महत्या केली. त्यानंतर आता निधीनेही गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.

सोशल मीडियावर ढिगाने शोकसंदेश

निधी तिवारीच्या मृत्यूची बातमी आणि तिची शेवटची पोस्ट वाचून चाहते हळहळले आहेत. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण तिला श्रद्धांजली वाहात आहेत. काही लोकांनी असंही म्हटलं आहे की ती फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नव्हती तर संघर्ष करून ती पुढे आली होती. तिच्या जाण्याने अनेकांना वाईट वाटलं आहे. अनेक युजर्सनी निधी तिवारीबाबत आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत.