Nigeria On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियावर संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. नायजेरियात सतत ख्रिश्चनांच्या हत्येच्या घटना घडत असून नायजेरिया सरकार त्यासाठी परवानगी देत असल्याचा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला. त्यामुळे अमेरिका आणि नायजेरियामधील संबंध ताणले गेले आहेत. तसेच नायजेरियात ख्रिश्चन धर्माला अस्तित्वाचा धोका असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.
एवढंच नाही तर ‘जर आम्ही हल्ला केला तर तो गंभीर असेल’, असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियाला दिला. तसेच अमेरिकेने नायजेरियाला परराष्ट्र विभागाच्या विशेष वॉचलिस्टमध्ये (Special Watchlist) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता नायजेरियाने ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत अमेरिकेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं की देशाचं संविधान सर्व धर्माच्या नागरिकांना संरक्षण देतं आणि सर्व समुदायांचं अधिक चांगलं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेशी समन्वय साधण्याची आमची तयारी आहे. ते म्हणाले की, “नायजेरियाला धार्मिकदृष्ट्या असहिष्णु म्हणून वर्णन करणं हे आपल्या राष्ट्रीय वास्तवाला प्रतिबिंबित करत नाही, तसेच ते सर्व नायजेरियन लोकांसाठी धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना विचारात घेत नाही.”
टिनुबू यांनी अमेरिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, २०२३ पासून नायजेरियन सरकारने ख्रिश्चन आणि मुस्लिम नेत्यांशी नेहमीच समन्वय साधला आहे. धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता हे आपलं मुख्य तत्व राहिलं आहे आणि राहील. नायजेरिया धार्मिक छळाला विरोध करतो आणि त्याला प्रोत्साहन देत नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला होता?
ट्रम्प यांनी असंही जाहीर केलं की जर नायजेरियातील परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिका नायजेरियाला मिळणारी सर्व मदत तात्काळ थांबवेल आणि लष्करी हस्तक्षेपाचे निर्देश देईल. ट्रम्प म्हणाले की, ‘त्यांनी संरक्षण विभागाला ज्याला ‘युद्ध विभाग’ म्हणून संबोधलं जातं, संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि असा इशारा दिला आहे की अमेरिकेचा कोणताही हल्ला गंभीर असेल.’
“मी आमच्या युद्ध विभागाला संभाव्य कारवाईसाठी तयारी करण्याचे निर्देश देत आहे. जर आम्ही हल्ला केला तर तो हल्ला गंभीर आणि क्रूर असेल. जसे दहशतवादी गुंड आमच्या प्रिय ख्रिश्चनांवर हल्ला करतात”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान, नायजेरियातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांवरून वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.
