उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गुरुद्वाराच्या छतावर ठाण मांडून बसलेल्या निहंग शिखांचे आंदोलन अखेर तीन दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. पाँटा साहिब येथून आलेल्या शीख समुदायाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी छतावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि हा वाद निवळला अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, “शीख नेत्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर छतावर बसलेले शेवटचे आंदोलकही खाली उतरले. त्यानंतर हे सर्व आंदोलक गुरुद्वारा परिसरातून रवाना झाले आहेत.”
…आणि वादाला तोंड फुटले!
हा संपूर्ण वाद गेल्या शनिवारी (२० जून) सुरू झाला. गुरुद्वारा प्रशासनाशी झालेल्या किरकोळ वादानंतर सात निहंग शिखांच्या एका गटाने नागरासू गुरुद्वाराच्या छताचा ताबा घेतला होता. कर्णप्रयाग येथे स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या त्यांच्या ४ साथीदारांची सुटका करावी, अशी या आंदोलकांची मागणी होती. आंदोलकांनी छतावरून दगडफेक करत गुरुद्वाराच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
आंदोलकांवर कारवाई होणार का?
या प्रकरणी आंदोलकांवर कारवाई होणार का? असे विचारले असता जिल्हा दंडाधिकारी मिश्रा म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोन गटांमधील अंतर्गत वाद असल्याने त्यांच्याच नेत्यांनी मध्यस्थी करून तो सोडवला आहे. हे सर्वजण दोन तासांपूर्वीच निघून गेले आहेत.”
‘लंगर’मधील वादातून ठिणगी
स्थानिक पोलीस अधीक्षक निहारिका तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि पाँटा साहिब येथील शिष्टमंडळाने गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर हा तिढा सुटला. तोमर म्हणाल्या, “आंदोलक खाली उतरताच आम्ही त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आता गुरुद्वारा व्यवस्थापनाचेही जबाब घेतले जातील. प्राथमिक माहितीनुसार, लंगरमध्ये (महाप्रसाद) जेवण वाढण्यावरून झालेल्या वादातून ही ठिणगी पडली होती.” सुरुवातीला छतावर ७ जण होते, मात्र मंगळवारपर्यंत त्यातील तिघे निघून गेले होते आणि फक्त ४ जण छतावर उरले होते.
पोलीस कारवाईविरुद्ध शीख समाजात तीव्र नाराजी
दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत सिंग कालका यांनी सांगितले की, त्यांनी पंजाबमधील या गटाच्या मुख्य प्रमुखांशी चर्चा केली होती. यानंतर कालका यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेऊन कर्णप्रयाग येथील कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला.
“चमोली पोलिसांनी केलेली कारवाई पूर्णपणे एकतर्फी असून यामुळे शीख समुदायात प्रचंड संताप आहे. दोन पक्षांमध्ये वाद झाला असल्यास दोन्ही बाजू ऐकून घेऊन निष्पक्ष कारवाई व्हायला हवी होती. त्यातच, अटक केलेल्या शीख तरुणांना त्यांच्या डोक्यावर ‘पगडी’ नसतानाच न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांच्याशी गैरवर्तन झाले,” असा गंभीर आरोप हरमीत सिंग कालका यांनी केला.
मुख्यमंत्री धामींचे चौकशीचे आदेश
या संवेदनशील प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शीख शिष्टमंडळाला योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची पोलीस महासंचालक पातळीवर चौकशी केली जाईल आणि १५ दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची जबाबदारी हरिद्वारचे एसएसपी नवनीत सिंह भुल्लर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी स्पष्ट केले की, कर्णप्रयाग आणि नागरासू येथील घटनांवर सरकार आणि प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. कायद्यानुसार सर्व पैलू तपासून पुढील कडक कारवाई केली जाईल.
