अमेरिकेतील मेरिलँडमध्ये निकिता गोधीशाला (२७) या भारतीय तरूणीचा मृतदेह एका फ्लॅटमध्ये आढळून आला. निकिता गोधीशाला हिच्या एक्स बॉयफ्रेंडने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली व त्यानंतर तो भारतात पळून गेला, अशी माहिती अमेरिकेतील पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनातून दिली होती. त्यानंतर निकिताची हत्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केल्याचा संशय अमेरिकेतील पोलिसांना होता. यावर आता निकिताचे वडील आनंद गोधीशाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणणे चुकीचे असून तो तिचा एक्स फ्लॅटमेट होता, असे निकिताच्या वडिलांनी म्हटले आहे. तसेच आरोपी व निकितामध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने निकिताची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने वृत्त दिले आहे.

निकिताचे वडील आनंद गोधीशाला म्हणाले, “निकिता उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. त्यानंतर तिने तिथे नोकरी स्वीकारली. आरोपी हा तिचा एक्स बॉयफ्रेंड होता, असे म्हणणे चुकीचे आहे. तो तिचा एक्स फ्लॅटमेट होता. चार जण त्या फ्लॅटमध्ये राहत होते. तिने नोकरीला लागल्यानंतर तो फ्लॅट सोडला व स्वतंत्र फ्लॅटमध्ये ती राहायला गेली. आरोपीने तिच्याबरोबर काहीतरी आर्थिक वाद घातला असेल, असा मला संशय आहे.” दरम्यान, आनंद गोधीशाला यांनी निकिताचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यास मदत करावी, अशी विनंती भारत सरकारला केली आहे.

निकिताच्या हत्येप्रकरणात इंटरपोलने तमिळनाडूतून अर्जुन शर्मा या आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या वर्तनाबाबत निकिताचे वडील म्हणाले, “त्याला पैसे उसणे घेण्याची सवय होती. त्याने माझ्या मुलीकडूनही उसणे पैसे घेतले होते. जेव्हा तिने त्याला पैसे परत मागितले त्यावेळी त्याने तिला फ्लॅटवर बोलावले. तिच्यावर हल्ला केला आणि पळून गेला. मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो की माझ्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणावा.” आनंद गोधीशाला यांची मोठी मुलगी देखील अमेरिकेत वास्तव्यास आहे.

पोलिसांत निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार देऊन आरोपी फरार

मेरिलँडमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता गोधीशाला या भारतीय तरूणीचा मृतदेह तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा (वय २६) याच्या फ्लॅटमध्ये पोलिसांना आढळून आला. अर्जूनने २ जानेवारी रोजी त्याची एक्स गर्लफ्रेंड निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार इलिकॉट सिटीतील (Ellicott City) पोलिस ठाण्यात दिली होती. निकिताला शेवटचे त्याच्याच कोलंबिया अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पाहिले होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी पोलिसांनी अर्जूनच्या फ्लॅटमध्ये पाहणी केली, तेव्हा त्यांना निकिताचा मृतदेह आढळून आला. तसेच आरोपी अर्जुन शर्मा हा विमानाने भारतात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दरम्यान, अर्जुन शर्मा ह्याला तमिळनाडूतून इंटरपोलने अटक केली आहे.