शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे वृत्त समोर येत असतानाच यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे टीका केली आहे. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागणार, अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून यासाठी ६५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या वतीने या स्मारकासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानाच्या १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवन विकसित केले जाणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र, ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर निविदेसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. अद्यापही या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त काही मराठी वृत्तवाहिन्यांनी शुक्रवारी दिले.

नीलेश राणे यांनी ही बातमी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला. ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहीत आहे उद्धव ठाकरे ह्यात पण ५ टक्के मागेल, असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

नीलेश राणे हे ट्विटरवरुन सातत्याने शिवसेनेवर टीका करतात. यापूर्वी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला होता. मला कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही पण संज्या एकदा ही स्वतः निवडणुकीला उभा राहिला नाही आणि टिपण्या मोठ्या, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते.